Breaking

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

*कागलच्या डी. आर. माने महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी*


मार्गदर्शन करताना डॉ.निलांबरी जगताप


*सौ.गीता माने : सह-संपादक* 


कागल : महाविद्यालयातील इतिहास विभाग, इतिहास मंडळ आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी सावित्रीबाई फुले (बालिका दिन) जयंतीनिमित्त डॉ. निलांबरी जगताप (समन्वयक, छत्रपती शाहू महाराज अध्यासन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सुरवातीला 'भारतरत्न

पुरस्कारप्राप्त पाच महिला" आणि "कोल्हापुरातील कर्तुत्ववान स्त्रिया या विषयीचे भित्तीपत्रिका प्रकाशन डॉ. निलांबरी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भित्तीपत्रिका तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या भित्तीपत्रिकांची माहिती प्रा. लतिका सावेकर यांनी उपस्थितांना करुन दिली.

    यानंतर मुख्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संतोष जेठीथोर यांनी केले. आपल्या प्रस्तावनेत त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी जो संघर्ष केला याची माहिती दिली तसेच फुले दाम्पत्यांनी सुरु केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाचे त्या काळातील महत्व सांगितले. विचारमंचावरील प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. संगिता एकसंबेकर यांनी करून दिली.

    डॉ. निलांबरी जगताप यांनी 'भारतातील स्त्रीवाद' या विषयावर आपले विचार मांडले.स्त्रीवादाची संकल्पना समजावून सांगताना स्त्रियांना सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने समान वागणूक मिळणे म्हणजे स्त्रीवाद होय असे मत व्यक्त केले. पूर्वीच्या काळातील स्त्रीस्वातंत्र्य हे पुरुषांनी घालून दिलेल्या चौकटीतील होते. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्त्रियांना सहभागी करून घेतले. भारतात आजही पुरुषप्रधान समाजव्यवस्था अस्तित्वात आहे. स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य मिळालेले नाही भारतात स्त्रिला देवी म्हणून पूजले जाते तरीही सामान्य स्त्रिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला जात नाही. स्त्रीमुक्तीसाठी समाजाने प्रयत्न करणे गरजेचे आहे तरच खऱ्या अर्थाने स्त्रीस्वातंत्र्य मिळेल व स्त्री-पुरुष समानता येईल असे त्यांनी सांगितले.

   या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. ए. एम. शिरदवाडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्व सांगितले व त्यांचे कार्य नवीन पिठीने पुढे चालू ठेवले पाहिजे कारण आजही मुलींना शिक्षण दिले जात नाही. बालविवाहाच्या घटना आजही घडत असतात असे मत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा