![]() |
दहावी बारावी बोर्ड परीक्षेला समोर जाताना |
*प्रा. चिदानंद अळोळी : लेखक व तज्ञ मार्गदर्शक*
विद्यार्थी मित्रहो थोड्याच दिवसात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होतील. 'परीक्षा' हा शब्द उच्चारताच मनात भीती निर्माण व्हावी, असे वातावरण सर्वत्र आहे. परीक्षेबाबत भीती वाटणे स्वाभाविक असले तरी ती भीती काल्पनिकच असते. विद्यार्थ्यांच्या मनात येणाऱ्या काही प्रश्नांमुळे मनात भीती निर्माण होते. मन विचलित होते. परंतु भीतीमागील कारणांचा धांडोळा घेतला, की मग काल्पनिक भीती दूर होते. मनावरील तणावाचे मळभ निघून जाते. अभ्यास होऊ लागतो, आत्मविश्वास वाढतो. परीक्षांपूर्वीचा हातात असलेला हा काळ विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने खूपच मौल्यवान आहे. मन सकारात्मक ठेवून या वेळेचा अभ्यासासाठी पुरेपूर उपयोग केला तर मिळणारे यश द्विगुणीत कसे होईल, याविषयी मार्गदर्शन करणारा प्रेरक लेख..
बघता बघता फेब्रुवारी आला. दहावी- बारावीच्या परीक्षांची नांदी सुरू झाली. सगळे वातावरण दहावी-बारावीमय होतेय. परीक्षा जसजशा जवळ येतात तसतशी तुम्हांला भीती वाटू लागते. मुलांनो, भीती हा मनाचा स्थायीभावआहे. समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकात म्हटले आहे, "भयें व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे." प्रत्येकाला कशा ना कशाची भीती वाटते. परंतु तिचा अतिरेक झाला तर मात्र तुमच्या अभ्यासावर परिणाम होतो. परीक्षेतील कामगिरीवर परिणाम होतो. त्यासाठी भीतीला दूर ठेवा. तुम्ही विचाराल, “भीतीला दूर ठेवता येते का ?" उत्तर आहे, "हो, भीतीला दूर 'ठेवता येते". याचे कारण म्हणजे बऱ्याचदा भीती ही काल्पनिक असते आणि वास्तवातील भीतीपेक्षा कल्पनेतील भीती ही अधिक त्रास देते. तुम्ही वास्तवाकडे नीट लक्ष दिले तर काल्पनिक भीती दूर होते.
भीती मनात निर्माण होते. तिच्या मूळाशी जाऊन विचार केला, तर लक्षात येते की भीती का निर्माण झाली? परीक्षा जवळ आली, की तुमच्या मनात काही प्रश्न येतात.
१. अभ्यास पूर्ण झालेला नाही. आता कसे होईल ?
२. परीक्षा केंद्रावरील वातावरण कसे असेल ?
३. सगळीच कृतिपत्रिका / प्रश्नपत्रिका अवघड तर नसेल ना ?
४. आपणाला पेपरमधील सर्व कृती / प्रश्न सोडवता येतील का ?
५. उरलेल्या पंधरा दिवसात / महिन्यात अभ्यास कसा होईल ?
६. काही विषयातील अडलेल्या भागाचे काय करावे ?
असे एक ना अनेक प्रश्न मनात येतात. त्यामधून भीती निर्माण होते. त्या प्रश्नांचा तपशीलाने विचार केला, की वस्तुस्थिती समोर येते. भीती दूर व्हायला मदत होते. तणाव निवळतो. उरलेल्या काळात छानपैकी अभ्यास होऊ लागतो. हे कसे घडते ? ते समजण्यासाठी वरील प्रश्नासंबंधी थोडीशी चर्चा करूया.
आपला पहिला प्रश्न आहे, की अभ्यास पूर्ण झालेला नाही. आता कसे होईल ? या प्रश्नासंबंधी विचार करताना लक्षात येते, की परीक्षेला बसणाऱ्या कोणत्याच विद्यार्थ्याला परीक्षेपर्यंत अभ्यास पूर्ण झालाय असे वाटत नाही. समजा, तुम्हाला दोन पाने लिहिण्याचे काम दिले आणि तुम्ही ती दोन पाने लिहून पूर्ण केली तर काम पूर्ण झाल्याचे दिसते. परंतु अभ्यासाचे तसे नसते. आपल्या मेंदूमधील स्मरण, आकलन, उपयोजन या क्षमता आणि अभिव्यक्ती कौशल्याचा विकास आपल्याला हातावर घेऊन पाहता येत
नाही. परंतु आपण पूर्वी अभ्यास केलेला असतो, सराव केलेला असतो, त्यामुळे परीक्षेच्या वेळी तो अभ्यास प्रकट होतो. हा तुमचा नववीपर्यंतचा / अकरावीपर्यंतचा अनुभव आहे.
काही वेळा असे वाटते, की आपला काहीच अभ्यास झालेला नाही. अशावेळी एक प्रयोग करून पाहा. कोणत्याही एका विषयाचे पाठ्यपुस्तक हातात घ्या. एका एका प्रकरणाचे एकेक पान पाहत सावकाश पुढे जा. मग तुम्हाला जाणवेल, की हे मी वाचले आहे, याचा मी चांगला सराव केला आहे, हे मला जमते, हेही मला येते. सर्व पाठ्यपुस्तक पाहून झाल्यावर लक्षात येईल, की तुमचा अभ्यास झाला आहे. एखाद-दुसरा घटक/ उपघटक अजून चांगला तयार होणे बाकी आहे. परंतु तरीही तुम्हाला जे वाटत होते, की अभ्यास झालाच नाही ते काही खरे नव्हते. हे तुमच्याही मनाला पटेल आणि भीतीत गुंतलेले मन सकारात्मकतेकडे वळेल. हीच तर मनाची गंमत आहे. म्हणूनच बहिणाबाई म्हणतात, "आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायांत." यासाठी तुम्ही तुमचे मन नेहमी सकारात्मक राहील असे पाहा. दुसऱ्यांचे सल्ले, उपदेश ऐकून उगीच विचलित होऊ नका.
तुमच्या मनात येणारा दुसरा प्रश्न म्हणजे परीक्षा केंद्रावरील वातावरण कसे असेल ? विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, एक पक्की खात्री बाळगा, की राज्यस्तरापासून ते तुमच्या परीक्षा केंद्रापर्यंतची सर्व यंत्रणा ही परीक्षा सुरळीतपणे पार पडावी आणि तुम्हाला शांत वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी अहोरात्र झटत असते. कोणत्याही आणीबाणीच्या क्षणी ही यंत्रणा तुमच्या पाठीशी उभी असते. तुम्हांला सहकार्य, मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असते. ही सर्व यंत्रणा फक्त आणि फक्त तुमच्या परीक्षेसाठी कार्यरत असते. तेव्हा मनातील भीती काढून टाका.
आपल्या मनात हमखास येऊ शकणारा प्रश्न
म्हणजे सगळीच कृतिपत्रिका / प्रश्नपत्रिका अवघड तर नसेल ना ? मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत परीक्षा दिल्यातच की. सर्वच्या सर्व कृतिपत्रिका / प्रश्नपत्रिका कधी अवघड होत्या का ? नव्हत्या ना ? मग आता तरी कशा असतील? तुम्ही बालभारतीच्या संकेतस्थळावरील नमुना कृतिपत्रिका पाहिल्यात, सोडवल्यात, त्या कुठे अवघड होत्या ? मनात येणाऱ्या अशा शंका खरोखरच काल्पनिक असतात. थोडा विचार केला, की त्या दूर होतात. वरील प्रश्नासारखाच पण थोडासा वेगळा प्रश्न मनात येऊ शकतो, तो म्हणजे कृतिपत्रिकेतील, प्रश्नपत्रिकेतील कृती प्रश्न मला सोडवता येतील का ? याचे उत्तर तुम्हीही शोधू शकाल. तुम्ही पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केला आहे. पाठाखालील स्वाध्याय / कृती सोडवल्या आहेत. तसेच बालभारतीने / बोर्डाने दिलेल्या कृतिपत्रिका पाहिल्या आहेत, सोडवल्या आहेत. एवढेच नव्हे तर नववीपासून तुम्ही अशा प्रकारच्या कृती सोडवल्या आहेत. आताच्या परीक्षेतही अशाच प्रकारच्या कृती असतील. तुम्ही निश्चितपणे त्या सोडवू शकाल. परंतु परीक्षेपूर्वीच्या काळात मनाचा गोंधळ उडाल्यामुळे असले किरकोळ प्रश्न मनाला विचलित करतात. म्हणून मन स्थिर ठेवा.
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उरलेल्या पंधरा दिवसात / महिनाभरात एवढा
सगळा अभ्यास कसा होईल ? विद्यार्थी मित्रांनो, खरेतर परीक्षेपूर्वीच्या उरलेल्या या कमी काळातही खूप अभ्यास होऊ शकतो. तुम्ही पूर्वी अभ्यास केलेला आहे. अनेक संज्ञा, संकल्पना, नियम, कृती समजावून घेतल्या आहेत. कोणतीही गोष्ट समजून कशी घ्यायची, त्या ज्ञानाचा अन्य परिस्थितीत वापर कसा करायचा, याचा तुमचा सराव झालेला आहे. आता तुम्हांला फक्त उजळणी करायची आहे. एखाद-दुसरा कठीण वाटणारा भाग समजून घ्यायचा आहे. यासाठी परीक्षेपूर्वीचा हा काळ अतिशय अनुकूल आहे. पूर्वीच्या अभ्यासामुळे मेंदू तल्लख झालेला आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे चटकन आकलन होते. वाचनाचा वेग वाढतो. अभ्यासाची गती वाढते. भराभर अभ्यास होत राहतो. पटपट समजते, लक्षात राहते. आत्मविश्वास वाढत जातो. आणीबाणीच्या या काळात शरीर, मन साथ देते. शरीर थकत नाही. मन कंटाळत नाही. परंतु असे असले तरी चांगला अभ्यास होण्यासाठी अधून-मधून थोडी थोडी विश्रांती घ्या. एखादे गाणे ऐका. प्रेरक कविता वाचा. निसर्ग पाहा. या विश्रांतीच्या काळात केलेल्या अभ्यासावर मेंदूत अभ्यासाची प्रक्रिया सुरू असते. मेंदूत योग्य प्रकारे जुळणी होत असते. विश्रांतीच्या काळात अभ्यास मेंदूत नीटपणे पोहचतो, ठसतो. अभ्यास झाल्या झाल्या सर्व काही आठवेल असे नाही. पण अभ्यास झालेला असतो. पेरल्यानंतर मातीखाली असणाऱ्या बीजासारखी ही स्थिती असते. मधल्या काळात माती खाली असलेले बीज दिसत नाही. परंतु योग्य वातावरण मिळाले, की अंकुरते. अभ्यासाचेही तसेच असते. झालेला अभ्यास दिसत नसला तरी परीक्षेच्या वातावरणात उत्तम प्रकारे प्रकटतो. म्हणून मनापासून अभ्यास करत राहा. प्रयत्नाच्या पाऊलवाटेने तुम्ही यशाच्या राजरस्त्यापर्यंत नक्की पोहचाल.
शेवटी एक मोठा कळीचा प्रश्न उरतो. काही विषयातील जो अडलेला, कठीण वाटणारा भाग आहे, त्याचे काय करायचे ? काही विषयात कुठे-कुठे थोडे अडलेले असते. कधी मराठीच्या दोन वृत्तांच्या लक्षणामध्ये गोंधळ होतो. कधी विज्ञानातील नियमाकडे नेणारी एखादी कृती नीट समजत नाही परंतु कसे विचारावे या संकोचाने आपण हे सगळे मनातच ठेवतो. मात्र असे करू नका. नि:संकोचपणे शिक्षकांकडे जा. जाण्यापूर्वी वेळ घ्या. अडलेल्या भागाची पूर्वकल्पना दया. शिक्षक तुम्हाला समजेल अशा भाषेत तो भाग समजून देतील. तो समजून घेण्यासाठी एखादी युक्ती सुचवतील. ज्यामुळे बराच काळ अडलेला, कठीण वाटणारा भाग पटकन समजेल. या काळात आकलनाचा झपाटा वाढलेला असतो. त्यामुळे सगळे पटकन समजते, पक्के तयार होते. जेव्हा एखादा भाग अडतो तेव्हा आपल्या मित्रांशी चर्चा करा. चर्चेतून अवघड सोपे होते. मात्र कुणीतरी सांगितले म्हणून या शेवटच्या टप्प्यात तुमची अभ्यासाची पद्धत बदलू नका.
मित्र-मैत्रिणींनो, आताचा वेळ खूपच मौल्यवान आहे. आताचा एकेक तास म्हणजे पूर्वीच्या एकेका दिवसाहून मोठा असतो. त्यामुळे अन्य गोष्टींमध्ये अजिबात वेळ वाया घालवू नका. वेळच्या वेळी जेवण घ्या. पुरेशी झोप घ्या. अभ्यास करताना अधून मधून ५-१० मिनिटांची विश्रांती
घ्या. मोबाईलचा वापर गरजेनुसार फक्त अभ्यासासाठी करा. अन्यथा मोबाईल, टीव्हीपासून दूर राहा. आता अगदी शांतपणे अभ्यास करा. स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा. इतरांशी तुलना करू नका. त्यामुळे मन विचलित होते.
दहावी-बारावीत केलेला अभ्यास हा पुढील अभ्यासासाठी बैठक निर्माण करतो. याच काळात आपण अभ्यासाच्या युक्त्या शिकतो. या काळात अभ्यासासाठी घेतलेले कष्ट म्हणजे जीवनातील मर्मबंधाची ठेव असते. भावी आयुष्यात दहावी- बारावीतील मार्क्स विसरले जातात. पण आपण चिकाटीने, तन्मयतेने केलेला अभ्यास आठवत राहतो तो पुढील अभ्यासासाठी प्रेरणा देतो. शेवटच्या टप्प्यातील मनःपूर्वक अभ्यासाने तुमची परीक्षेतली कामगिरी निश्चितपणे अधिक उंचावेल.
कधी कधी थोडा ताण येतो, भीती वाटते, नाही असे नाही, पण त्यामुळे आपण गांभीर्याने अभ्यास करतो. अभ्यास झाला, की ताण निवळतो. भीती कमी होते. अशाप्रकारे अभ्यासाचा ताण घेता घेता तो दूर कसा करायचा हेही दहावी- बारावी शिकवते.
. पुढे जीवनात आव्हाने, संकटे अचानक उभी राहतात. त्या मोठ्या परीक्षाच असतात. दहावी-बारावीच्या परीक्षांमधून जीवनातील अशा परीक्षांना सामोरे जाण्याचे बाळकडू मिळते. त्यामुळे घाबरत घाबरत नव्हे तर आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. यश तुमचेच असेल.
परीक्षेतील उज्ज्वल यशासाठी मनापासून शुभेच्छा !!!
💯
उत्तर द्याहटवा