Breaking

बुधवार, २९ मार्च, २०२३

*निमशिरगाव मधील आई वृध्दाश्रमाच्या बंद पडलेल्या बांधकामासाठी इंदर भोसले या युवकाचा दोन लाख लोकांना मदतीसाठी भेटण्याचा संकल्प..*

 

आई वृद्धाश्रमातील वृद्धानी इंदर भोसले युवकास शुभ आशीर्वाद देऊन मदती निधी संकलनसाठी पाठवले 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


_शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी केले कौतुक आणि दिल्या शुभेच्छा.._


जयसिंगपूर : आई वृध्दाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले यांच्या अवघ्या वीस वर्षाच्या इंदर भोसले या मुलाने आई वृध्दाश्रमाच्या बंद पडलेल्या बांधकामासाठी दोन लाख लोकांना भेटण्याचा संकल्प केला आहे. या संदर्भात शिरोळचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांची भेट घेतली असता. त्यांनी सदर संकल्पा बाबत इंदर भोसले याचे कौतुक करून त्याला त्याच्या संकल्पसिध्दी साठी शुभेच्छा दिल्या. आणि दहा रूपये न देता एक हजार रुपयांची मदत करून आपली सुध्दा एक सामाजिक जबाबदारी पार पाडली. आणि लवकरात लवकर तुझा संकल्प पुर्ण होवो. आणि वृध्दाश्रमाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होवो. असा आशिर्वाद दिला.

       निमशिरगाव येथे सुरू असलेल्या आई वृध्दाश्रमाचे  लोकवर्गणीतून आता पर्यंत स्लॅब पर्यंतचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. मात्र निधी अभावी हे बांधकाम गेली सहा महिन्यांपासून बंद पडले आहे.  स्लॅब आणि उर्वरित बांधकामासाठी एकुण वीस लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. 

         सध्या आई वृध्दाश्रम एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असुन ऊन, वारा , आणि पावसाचा सामना करत येथील वृध्दांना आयुष्य कंठावे लागत आहे.  या वृध्द लोकांना एक सुरक्षित आसरा मिळावा यासाठी भोसले परिवाराची धडपड सुरू आहे. संजय भोसले आणि त्यांचा परिवार गेली सात वर्षांपासून निस्वार्थी पणे या वृध्दांची सेवा सुश्रुषा करत असुन या आई वृध्दाश्रमास मोठे योगदान देत आहे. 

            आई वृध्दाश्रमाच्या बंद पडलेल्या बांधकामासाठी वडिलांची चाललेली फरफट आणि धडपड पाहून इंदर भोसले याने दोन लाख लोकांना भेटण्याचा आणि त्यांच्या कडुन शंभर , पाचशे , हजार नाही तर फक्त दहा रूपयांची मदत घेण्याचा संकल्प केला आहे. सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्येक गावातील प्रत्येक घरात जाऊन तो मदतीसाठी आवाहन करत आहे. कोणी त्याला पुढे हो , तर कोणी त्याला वृध्दाश्रमाच्या नावावर फसवेगिरी सुरू आहे, तर कोणी त्याला तुझ्या सारखी भिकारी दररोजच येत असतात, खोटे बोलुन पैसे उखळतात , असे बोलून अपमान करतात, हेटाळणी करतात तर कांहीं जण हाकलून देतात. पण नाराज न होता, आपल्या उदात्त हेतू साठी तो पुढच्या व्यक्तीकडे जातो. कधीकधी अपमान, अवहेलना, दु:ख सहन न झालेने त्याला रडु कोसळते. पण सकाळी उठून पुन्हा तो आपल्या संकल्पसिध्दी साठी बाहेर पडतो. ज्यावेळी दहा रुपयांची अपेक्षा केली जाते. त्यावेळी त्याला एक दोन रुपयावरच समाधान मानावे लागते. तर कधीं कधीं दिवस दिवस फिरून फक्त ८० , ९० रूपये मिळतात तर कधी आठशे नऊशे रूपये. तरीसुद्धा त्याने आपली जिद्द, चिकाटी सोडली नाही. तर कोणत्याही परिस्थितीत वृध्दाश्रमाच्या बांधकामासाठी २० लाख रूपये मदत गोळा करणारचं  हा त्याने एवढ्या लहान वयात केलेला संकल्पच मनाला भावनारा आहे.

       दोन लाख लोकांना भेटण्यासाठी किती दिवस लागतील माहित नाही, दोन लाख लोकं प्रत्येकी दहा रूपयेच देतील याची शास्वती नाही, बांधकामासाठी वीस लाख रुपये गोळा होतील का नाही.हे माहित नाही. पण केलेली जिद्द आणि संकल्प खरोखरच कौतुकास्पद आहे. असे अनेकांनी आपले मत व्यक्त करून त्याचे कौतुक केले आहे.

      संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी सुध्दा आई वृध्दाश्रमाच्या बांधकामासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा