Breaking

रविवार, १६ एप्रिल, २०२३

*सामाजिक प्रश्नांची जाणीव जागृती व निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना एक कार्यशील संघटना : मानव्यशास्त्र अधिष्ठाता प्रा.डॉ. महादेव देशमुख*


अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. महादेव देशमुख, संचालक डॉ.तानाजी चौगले व अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर :  राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयकांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचणे शक्य आहे. हा विभाग समाजाशी जोडलेला आहे. त्यामुळे विविध योजना, धोरणे यांचा प्रचार आणि प्रसार उत्तमरित्या करणे शक्य आहे. त्या दृष्टीने समन्वयकांनी कार्यरत राहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी आज येथे केले.

       शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित 'सार्वजनिक वित्तिय व्यवस्थापन प्रणाली अर्थात पीएफएमएस प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळे'च्या उद्घाटन प्रसंगी डॉ. देशमुख अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  यावेळी व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाच्या कक्ष अधिकारी शीतल उगले यांची प्रमुख उपस्थिती होती.


      डॉ. देशमुख म्हणाले, शिवाजी विद्यापीठ संलग्नित २८६ महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर, समानता आणि गुणवत्ता यावरही भर दिला जात आहे.  एन.एस.एस व एन.सी.सी, संरक्षण सेवा क्रेडिट सिस्टीम अंतर्गत घेतले जात आहे.  एन.एस.एस.चे विद्यार्थी नोकरी करणारे न बनता नोकरी निर्माण करणारे बनावेत, अशी अपेक्षा आहे. देशामध्ये तरूणांची संख्या ६५ टक्के आहे.  या तरूणांचे सरासरी




आयुर्मान ३२ वर्षे आहे. यांना मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. ती जबाबदारी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे.
डॉ. देशमुख पुढे म्हणाले, सामाजिक प्रश्नांची जाणीव-जागृती व निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना एक कार्यशील संघटना आहे.

        शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिध्दार्थ शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यापीठास समाजाशी जोडण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मोठे योगदान आहे.  विद्यार्थी हा प्रगतीशील समाजाचा घटक बनण्यासाठी हा विभाग नेहमी विविध योजना राबवित असतो. त्यांना समाजघटकांनीही योग्य प्रतिसाद देऊन त्या योजना यशस्वीरित्या राबवून शासनाला सहकार्य करावे.

    .पीएफएमएस योजनेची माहिती देताना स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक विवेककुमार सिन्हा म्हणाले, पीएफएमएस ही एक सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवा आणि संगणकीय प्रणाली आहे.  तिच्या सहाय्याने शासनाकडून दिले जाणारे विविध योजनांशी संबंधित अनुदान, सवलती आणि त्या संबंधित प्राप्त होत असलेले इतर आर्थिक लाभ हे कोणाच्याही हस्तक्षेपाविना इंटरनेटच्या माध्यमातून थेट युजरच्या बँक खात्यामध्ये जमा होते. युजरला कुठलीही धावपळ न करता त्याची रक्कम ऑनलाईन पद्धतीने थेट बँक खात्यावर प्राप्त करता यावी, तसेच आपले बँक स्टेटस ऑनलाईन चेक करता यावे, हा पीएफएमएसचा मुख्य हेतू आहे. या पद्धतीमुळे युजर्सचा वेळ वाचतो आणि कामात पारदर्शकता येते.

      शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा.डॉ.तानाजी चौगले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.डॉ. चौगले यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिराचा हेतू स्पष्ट केला.कराडचे प्रा. डॉ. अभय पाटील यांनी आभार मानले. 

          यावेळी, लेखा विभागाचे उपकुलसचिव रमेश लिधडे, विद्यार्थी विकास विभागाचे प्र.संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे दिनेश जाधव यांच्यासह कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील समन्वयक आणि कार्यक्रम अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा