Breaking

रविवार, १६ एप्रिल, २०२३

*आर्थिक व सामाजिक विषमतेने विभागलेल्या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून एकसंघ केले ; प्रा.डॉ. गिरीश मोरे यांचे प्रतिपादन*


जयसिंगपूरच्या बौद्ध संस्कार मंडळात मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. गिरीश मोरे व उपस्थित अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ, जयसिंगपूर यांचे वतीने 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान गुरु-शिष्य जयंती सोहळा उत्साहात साजरा करणेत आला. सायंकाळच्या शोभायात्रेस उपासक- उपासिका तरुण यांचा प्रचंड सहभाग होता.

    प्रारंभी सकाळच्या सत्रात रुकडीच्या छ. शाहू कॉलेजचे प्रा.डॉ.गिरीश मोरे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.जात, धर्म, पंथ, संप्रदाय, या विषमतावादाने विभागलेला देश डॉ. बाबासाहेबांनी संविधानाने एकत्र केला. हेच संविधान देशाचा श्वास आहे, तो थांबला तर विषमतावादी मनुस्मृतीचा कायदा लागू होऊन पुन्हा देश विभागला जाईल. महासत्तेचे स्वप्न पाहणा-या तरुणांनो आज देशापुढचे हेच मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन डॉ.गिरीश मोरे यांनी केले.

         डॉ. गिरीश मोरे पुढे म्हणाले. "इतिहासाचे अवलोकन केले तर आपल्या लक्षात येईल की, हा देश कधीही एकसंध नव्हता. तो विभाजित होता. इथल्या बहुजनांवर उच्च वर्गीयांचा वर्णाधिष्ठीत, धर्माधीष्ठित पगडा होता. माणूसच मानसाला जनावरांची वागणूक देत होता. या घाणेरड्या व्यवस्थे विरुद्ध जोतीराव फुले आणि बाबासाहेबांनी विद्रोह केला. पण हा विद्रोह स्फोटक नव्हता पण क्रांतीकारी होता. याच विस्कळीत असलेल्या भारताला एका सोनेरी माळेत गुफूंन त्याला एकसंध राष्ट्र बनवलं ते बाबासाहेबांनी. पण आज तेच संविधान खिळखिळे करुन देशाला पुन्हा अराजक अशा धर्माधीष्ठित व्यवस्थेकडे घेऊन जात आहेत. ही राष्ट्र या संकल्पनेला सुरुंग लावणारी सुरूवात आहे. तेव्हा आपण संविधान वाचेल अशी नवी चळवळ उभी करायला हवी.

      अध्यक्षस्थानी पू.भ.प्रा.डॉ. यशकश्यपायन महाथेरो होते. अध्यक्षस्थानावरुन बोलतांना पू भ. डॉ. यशकाश्यपायन महाथेरो यांनी राष्ट्र उभारणीत बाबासाहेबांचे योगदान विशद केले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष आयु. रमेश कांबळे तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. प्रवीण चंदनशिवे यांनी करुन दिला व आभार प्रा. डॉ. धनंजय कर्णिक यांनी मानले.

      सायंकाळी सजवलेल्या रथात जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची जयसिंगपूर शहरांतून शोभायात्रा काढणेत आली. सदर कार्यक्रमास बहुसंख्य उपासक उपासिका, तरुण उपस्थित होते. यावेळी आतषबाजी, महापुरुषांच्या विचारांच्या घोषणांनी शहर न्हावून निघाले.

    प्रत्येक चौकात आतिशबाजी होत होती. चौकाचौकात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार घालणेत आले.अडीच तासांनी ही शोभायात्रा वैशाली बुद्ध विहार येथे पोहोचली. शेवटी मंडळाचे अध्यक्ष रमेश कांबळे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी जयसिंगपूर पोलिस स्टेशनचे कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी, सर्व तरुण मंडळे यांचे योगदान व सहकार्य मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा