Breaking

शुक्रवार, २१ जुलै, २०२३

*वाहतुकीच्या नियमांबाबत विद्यार्थ्यांनी अधिक दक्ष व काटेकोरपणे अंमलबजावणीची गरज : वाहतूक पोलीस मा.सचिन चौगुले यांचे प्रतिपादन*


वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन करताना वाहतूक पोलीस सचिन चौगुले, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व अन्य मान्यवर

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी,बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये जयसिंगपूर पोलीस ठाणेच्या वाहतूक विभागाच्या वतीने अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या निर्देशानुसार 'वाहतूक सुरक्षा व नवीन दंड नियमाबाबत' विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

      वाहतूक पोलीस मा.सचिन चौगुले मार्गदर्शन करताना म्हणाले, प्रत्येक नागरिक व विद्यार्थ्यांनी स्वतःची जबाबदारी ओळखून वाहतूक नियमाबाबत प्रामाणिक योगदान देणे गरजेचे आहे. या आधारे वाहतूक सुरक्षेला कायमस्वरूपाचे कवच प्राप्त होईल. मनुष्याला जगण्यासाठी त्याच्या शरीरातील रक्तवाहिन्यांचे जाळे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्व कोणत्याही देशातील वाहतूक मार्गाचे आहे. कोणत्याही देशाची आथिर्क व्यवस्था देशातील वाहतूकीची साधने, मार्ग व वाहतूक नियमांची अंमलबजावणी यावर अवलंबून असते. 

       सचिन चौगुले पुढे म्हणाले, देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाची प्रगती आम्हाला सुखावणारी आहे. मात्र या सुखद चित्राला खंत वाटावी अशी काळोखी किनार आहे, ती रस्त्यावरील वाढणारे अपघात व त्यातील बळी पडणाऱ्यांच्या संख्येची आहे. वाहतुकीची साधने विकसित व विस्तृत झाली. मात्र  वाहनधारक, चालक व मालकांची मानसिकता वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणारी आहे. त्यामुळे विकासाच्या वाटेवर आपण खूप मागे राहिलो हे  सत्य मान्य करावे लागेल. यासाठी वाहतुकीच्या नियमांबाबत अधिक दक्ष होणे गरजेचे  आहे. वाहतुकीचे नियम व दंड आकारण्यासाठी नव्हे, तर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी असते याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी. तसेच वाहतुकीच्या नियमांची वर्षभर प्रामाणिक अमलबजावणी होणे अपेक्षित आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वतःची जबाबदारी ओळखून वाहतूक नियमांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी.

       ते पुढे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःजवळ लायसन्स बाळगावे, ट्रिपल सीट प्रवास टाळावा, नंबर प्लेट विना वाहतूक टाळावी, गाडी चालविताना फोनचा वापर टाळावा, सिग्नलचे नियम व अन्य वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन केल्यास खऱ्या अर्थाने राष्ट्र विकासासाठी विद्यार्थ्यांचे योगदान मानले जाईल.

      अध्यक्षस्थानावर बोलताना प्राचार्य प्रा.डॉ.सुरत मांजरे म्हणाले, विद्यार्थी हा देशाचा भविष्यरुपी कणा असून विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखून नियमांचे प्रामाणिकपणे अंमलबजावणी केल्यास वाहतूक व्यवस्था सुगम व सक्षम होण्यास चालना मिळेल याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला असली पाहिजे.

      या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमाबाबतचे प्रश्न आवर्जून विचारले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण उत्तराच्या माध्यमातून  करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ.एम.व्ही.काळे यांनी मानले.

     सदर जनजागृती व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या सूचनेनुसार व अपर पोलीस अधीक्षक मा. निकेश खाटमोडे- पाटील यांच्या आदेशानुसार तसेच जयसिंगपूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक मा.संदीप कोळेकर यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात आले. याप्रसंगी पोलीस कर्मचारी काशीराम कांबळे व विशाल खाडे (११२ चालक) यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी निर्भया पथकातील पोलीस कर्मचारी शैलेश पाटील, विक्रम मोरे व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

    विद्यार्थी वर्गाकडून या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा