Breaking

शनिवार, २९ जुलै, २०२३

*राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला विरोध करण्यापेक्षा त्याचा स्वीकार करून शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली पाहिजे : डीन प्रा.डॉ.एस.एस. महाजन यांचे प्रतिपादन*


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.एस.एस.महाजन, संस्थेचे सचिव डॉ.महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे डीन प्रा.डॉ.एस.एस.महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ.महावीर अक्कोळे, मा.शशांक इंगळे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.

        प्राचार्य डॉ.मांजरे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यशाळा आयोजनाचा उदात्त हेतू स्पष्ट केला. पाहुण्यांचा परिचय NEP कॉर्डिनेटर उपप्राचार्य डॉ.एनएल.कदम यांनी केला.

      कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व डीन प्रा.डॉ.एस.एस. महाजन मार्गदर्शन करताना म्हणाले, जागतिक पातळीवर शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिगत करून बहुविद्याशाखीय प्रणाली व सामाजिक सहभागितेच्या माध्यमातून राष्ट्र विकासात घडवण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० महत्त्वाचे आहे. मुळात या शैक्षणिक धोरणाला विरोध करण्यापेक्षा त्याचा स्वीकार करून शैक्षणिक क्षेत्रात क्रांती आणली पाहिजे.यासंदर्भात त्यांनी क्रेडिट सिस्टम, सामाजिक सहभागिता, जीडीपी मधील शैक्षणिक खर्चाचा हिस्सा वाढवणे, बहुविद्याशाखीय धोरण, अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट, शैक्षणिक लवचिकता, कौशल्य आधारित ज्ञान व मूल्य या असंख्य मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.

    संस्थेचे सचिव व प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले, पारंपारिक शिक्षण पद्धती ऐवजी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण स्वीकारून शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांचे व्यक्तिमत्व परिपूर्ण करून विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करण्यासाठी ही एक नामी संधी आहे. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून सामाजिक विचाराबरोबर राष्ट्रीय विचार, विविध कौशल्य आत्मसात होतील.शैक्षणिक व सामाजिक संवेदनशीलते बरोबर विविध क्षेत्रातील समरसता यामुळे निर्माण होणार आहे. 360 डिग्री अॅप्रोच अर्थात सर्वकष ज्ञान आकलन होण्याची शक्यता आहे.

     या कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.पी.सावंत यांनी मानले. तर उत्तम सूत्रसंचालन सादरीकरण डॉ.सौ.एस.आर.नकाते यांनी केले.

     या कार्यक्रमास सीनियर व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाबद्दल उपस्थित सर्व घटकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा