Breaking

बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३

*जयसिंगपूर कॉलेज कॅम्पसमध्ये ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न*


स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, संस्थेचे सर्व सदस्य व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर  : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीच्या जयसिंगपूर कॉलेज कॅम्पस मध्ये ७७ वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी स्थानिक संस्थेचे डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ.महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व प्राचार्य सौ.प्रिया गारोळे उपस्थित होते. 

      याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर एनसीसी सीनियर अंडर ऑफिसरने मार्च पासिंग करण्याची अनुमती घेतली. यावेळी एनसीसी कॅडेट्सनी पथसंंचलन केले. या स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमातील वेगळं वैशिष्ट्य म्हणजे अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी पथसंंचलनामध्ये सहभाग नोंदवून उत्तम पद्धतीने पथसंंचलन केले. याच वेळी अनेकांत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  नयनरम्य मानवी मनोरेचे उत्तम सादरीकरण करून उपस्थित घटकांकडून वाहवाह मिळवला. प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी एनसीसी कॅडेट्स व विद्यार्थ्यांना शपथ दिली. यावेळी अनेक इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाषण सादर केले.


        या स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेचे सदस्य प्रा. आप्पासाहेब भगाटे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या देशभक्तांचा जीवन परिचय आपणास स्फूर्तीदायी आहे.आज देशभक्तांच्या विचारांचे व कृतीचे स्मरण करावे. त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आपण देश विकासात्मक, रचनात्मक व कृतिशील कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवाकार्य विद्यार्थ्यांनी केले पाहिजे.

      यावेळी बी.एस्सी फूड सायन्स विभागाने बनवलेल्या तिरंगा बर्फीचा वितरण करण्यात आले. तसेच कॉलेजमधील अनेकांत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी मोफत जिलेबी वाटप करण्यात आले. स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे नेटके व उत्तम सूत्रसंचालन प्रा. बाळगोंडा पाटील यांनी केले.

       या ध्वजारोहण कार्यक्रमास विशेष करून संस्थेचे सर्व पदाधिकारी-सदस्य उपस्थित होते. तसेच अनेकांत पतसंस्थेचे चेअरमन प्रा.के.बी.पाटील, व्हाईस चेअरमन प्रा.पी.सी.पाटील व मॅनेजर राहुल पाटील उपस्थित होते.

       या प्रसंगी सीनियर व  कॉलेज मधील प्राध्यापक वृंद, प्रशासकीय सेवक व कर्मचारी,अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी- पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा