![]() |
राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. तातोबा बदामे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
*प्रा.डॉ.तातोबा बदामे यांना राज्यस्तरीय एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार जाहीर*
कोल्हापूर : प्रा.डॉ.तातोबा बदामे यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार नुकताच घोषित झाला. राज्य शासनाच्या दि.६ नोव्हेंबर,२०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या जी.आर. मधून सदर पुरस्काराची घोषणा करण्यात आली . डॉ.तातोबा बदामे यांचा पद्मभूषण डॉ.वसंतरावदा पाटील महाविद्यालय, तासगाव येथील मराठी विषयाचे प्रोफेसर म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक आहे.
![]() |
कुलगुरू प्रा.डॉ. डी.टी.शिर्के.यांचे हस्ते डॉ.तातोबा बदामे यांचा सत्कार होत असताना शेजारी संचालक डॉ.तानाजी चौगले व अन्य मान्यवर |
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने सन २०२१-२०२२ साठी सर्वोत्कृष्ट एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ.तातोबा बदामे यांची काही दिवसांपूर्वी निवड झाली होती.त्याबद्दल त्यांचा सत्कारही मा. कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी.शिर्के यांच्या हस्ते व संचालक डॉ.तानाजी चौगले यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता.
डॉ.तातोबा बदामे हे गेली आठ वर्षे एन.एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी म्हणून "Not Me ! But You" या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे सातत्याने विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी काम करीत आहेत. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी व माणुसकी जपण्याचं काम ते करीत आहे. त्यांनी एनएसएस कार्यक्रम अधिकारी म्हणून सांगलीतील महापूरात, पूरग्रस्तांना तात्काळ अन्न व कपडे पुरवठा,महापूर काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आपत्ती व्यवस्थापन काळात १५ दिवस विद्यार्थी पाठविले,महापूर ओसरल्यावर धनगाव-तावदरवाडी येथे स्वच्छता अभियान राबविले.यावेळी शाळा,ग्रामपंचायत,मंदिरे,रस्त्यांवरील गाळ कडून स्वच्छता केली. कोरोना महामारीत मास्क वाटप,लसीकरण जनजागृती,माझे गाव कोरोना मुक्त गाव या विद्यापीठाच्या अभियानात सक्रीय सहभाग घेऊन सात गावे दत्तक घेऊन कोरोना संकटाच्या जाणीवजागृतीचे व कोरोना पेशंटना सल्ला मार्गदर्शन यासाठी केलेलं काम कौतुकास्पद आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे आणि विद्यापीठाचे NSS संचालक प्रा.डॉ.चौगले यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली एनएसएसच्या माध्यमातून केंद्र शासन राज्य शासन,विद्यापीठ व सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निश्चित केलेली विविध सामाजिक उपक्रमात ते सक्रिय सहभागी होतात. निसर्गाची असलेली आवड यामुळे ते वृक्षारोपण करण्यामध्ये आघाडीवर असतात.ग्रामपंचायत सावर्डेचे सरपंच मा.प्रदीप माने-पाटील(काका)व सर्व ग्रामपंचायत सदस्य व पाणी फौंडेशनबरोबर दत्तक गाव सावर्डे येथे सी.सी.टी.चर खुदाई, बंधारा निर्मिती,ग्रामतलाव स्वच्छता व सुशोभिकरण,स्मशानभूमी स्वच्छता, अतिक्रमण निर्मुलन, नालेसफाई ,ग्रामस्वच्छता इत्यादी कामात एन.एस.एस. स्वयंसेवकांबरोबर स्वत: सक्रीय सहभाग घेतला. सावर्डे गावातील कामाची दखल अभिनेते आमीर खान यांनी घेतलीव ते स्वत:गावास भेट देण्यासाठी आले. प्रबोधन चळवळीच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते नेहमीच धडपडत असतात. फिट फॉर इंडिया, राष्ट्रीय मतदार नोंदणी व जनजागृती, कायदा जागृती शिबीर तसेच विविध सामाजिक प्रश्नासाठी पुढाकार घेणे व स्वच्छता अभियानामधील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.
प्रा.डॉ. बदामे आव्हान कॅम्प व स्थानिक शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचे उत्तम नेतृत्व करीत त्यांनी आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची प्रचीती दिली आहे. आपल्या कर्तुत्वाने महाविद्यालायात एनएसएस कार्यक्रम अधिकारी या जबाबदारी बरोबरच मराठीचे प्राध्यापक म्हणूनही उत्तम कामगिरी ते करत आहे. अभ्यासू प्राध्यापक, उत्तम वक्तृत्व, सूत्रसंचालन, विविध सामाजिक स्पर्धेमध्ये सहभाग, स्मार्ट व्यक्तिमत्व व सामाजिक संवेदनशीलता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची गुण वैशिष्ट्ये प्रकर्षाने दिसून येतात.
प्रा.डॉ. तातोबा बदामे यांचा जीवन प्रवास हा अत्यंत संघर्षमय व प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याची किमया स्व:कर्तुत्वावर केली आहे. विद्यार्थी तसेच विविध स्पर्धेत सहभागी होणे, विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक चळवळीत जाणीवपूर्वक सहभागी होऊन अशा चळवळींना बळ देणारे एक धडाडीचे व्यक्तिमत्व होय. शिवाजी विद्यापीठात एम. ए. मराठी या विषयासाठी प्रवेशित झाल्यानंतर 'कमवा व शिका' या स्वावलंबी बनवणाऱ्या व विद्यार्थी हित जोपासणाऱ्या योजनेत सहभागी होऊन त्यांनी एम.ए. यशस्वीपणे पूर्ण केलं. विद्यापीठात शिकताना विविध व्याख्यानमालेचे नियोजन व सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी सांभाळत असत. बोलके,आनंदी व संवेदनशील व्यक्तिमत्व असल्यामुळे विद्यार्थी मित्र, विद्यापीठ प्रशासनातील सर्व मंडळी व प्राध्यापक गुरूंवर्यांचा बरोबर अत्यंत घनिष्ठ व सोहार्दपूर्ण संबंध होते. विद्यापीठातील मराठी वक्तृत्व स्पर्धेत ते प्रथम क्रमांकाने यशस्वी होत. अशावेळी अभ्यासू असल्याने ते सेट/नेट उत्तीर्ण झाले. कोणत्याही प्रकारचा अहंकार नसल्याने ते विकास व प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहत असत. शाहू,फुले, आंबेडकर,महर्षी शिंदे व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे व कृतीचे सच्चे पाईक म्हणून कार्य करीत आहेत. सच्चा, प्रामाणिक ,पुरोगामी कार्यकर्ता तसेच महाराष्ट्र विवेक वाहिनी अर्थात पद्मश्री डॉ. दाभोळकरांच्या कृतीशील विचारांची प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य करीत असल्याने त्यांची ओळख विद्यापीठ कार्यक्षेत्रात आहे. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांचा सामाजिक कार्याचा व बांधिलकीचा जीवन प्रवास व प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून तासगावच्या पद्मभूषण डॉ.वसंतदादा पाटील या महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत.प्रा.डॉ.बदामे हे चळवळीचे खंदे समर्थक व कृतिशील प्राध्यापक असल्याने त्याचा लाभ राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांना होत आहे. एन.एस.एस ला विद्यार्थी चळवळीचे रूप देऊन विद्यार्थ्यांना कार्यक्षम,कृतिशील व विद्यार्थ्यांचे नैतिक राष्ट्रीय चरित्र घडविणे हा त्यांचा स्थायीभाव झाला आहे. खऱ्या अर्थाने राज्य शासनाने राज्यस्तरीय कार्यक्रम अधिकारी प्रशंसा पुरस्कार जाहीर करून त्यांच्या या समाजभान जपणाऱ्या कार्याला एक प्रकारचे सक्षम बळ दिले आहे.
![]() |
संचालक प्रा.डॉ. तानाजी चौगले, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर |
कार्यशील व दूरदृष्टी असलेले रासयो, संचालक डॉ.तानाजी चौगले यांनी डॉ.तातोबा बदामे यांच्या वैयक्तिक बायोडेट्याचा अभ्यास करून त्यांना कसे यश मिळेल याबाबत त्यांनी विशेष अभ्यास केला. त्याला यश लाभणार याबद्दल डॉ. चौगुले यांना खात्री होती.डॉ. चौगले यांच्यामुळे डॉ.तातोबा बदामे काम करण्यासाठी स्फूर्ती व बळ मिळाले.
![]() |
प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे, पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव |
प्राचार्य,डॉ.मिलिंद हुजरे यांचे विशेष सहकार्य लाभले. एक कर्तव्य दक्ष प्राचार्य म्हणून आपली उत्तम जबाबदारी पार पाडताना डॉ.तातोबा बदामे यांना वेळोवेळी मार्गदर्शन, विशेष सहकार्य व उत्तम सुसंवादाच्या माध्यमातून त्याला प्रेरणा देत होते. तसेच त्यांचे उत्तम नेतृत्व, कर्तुत्व व सामाजिक बांधिलकीचे अनुकरण करीत डॉ.तातोबा बदामे यांनी हे यश संपादन केले. प्राचार्य हुजरे यांनी विशेष परिश्रम घेऊन त्यांना वेळोवेळी सहकार्य केले. अर्थात गुरु म्हणून विशेष कामगिरी पार पाडली.त्यांचेही विशेष कौतुक सर्वत्र होत आहे.
जय हिंद न्यूज नेटवर्क बोलताना डॉ.तातोबा बदामे म्हणाले, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कुलगुरू प्रा.डॉ. डी.टी.शिर्के, प्र. कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव प्रा.डॉ. व्ही.एन.शिंदे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य शुभांगी गावडे,सहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ,सांगली विभागप्रमुख प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे,प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली. सांगली जिल्हा समन्वयक डॉ. पोपटराव माळी यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा.डॉ.मिलिंद हुजरे यांच्या कडून तर सतत विशेष मोलाचे मार्गदर्शन मिळाले.त्याचबरोबर या यशामध्ये एनएसएस मधील सहकारी प्रा.डॉ.अमोल सोनवले, प्रा.डॉ.पवन तेली,प्रा.अण्णासाहेब बागल, प्रा.डॉ.एस.आर.घोगरे यांनी तसेच एन.एस.एसचे सर्व विद्यार्थी स्वयंसेवक आणि महाविद्यालयातील सर्वच घटकांनी दिलेली साथ व केलेलं उत्तम सहकार्य यामुळेच मला हे यश मिळाले आहे.
डॉ.तातोबा बदामे पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून काम करण्याची प्रेरणा व माझ्या कृतीमध्ये संवेदनशीलता निर्माण केली.याही पुढे असंच कार्य सुरू ठेवणार आहे.यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. खऱ्या अर्थाने चळवळीतील एका हाडाच्या प्राध्यापकाला पुरस्कार प्राप्त होणे हे चळवळीच्या दृष्टीने महत्वाचे होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा