Breaking

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

*अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी सातारचे ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे विराजमान*


अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी सातारचे प्रा.डॉ. अनिलकुमार वावरे यांचा सत्कार करताना सर्व सन्माननीय घटक


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमधील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे यांची अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या ४७ व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड येथील वाघिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वार्षिक अधिवेशनामध्ये ही निवड झाली. 

      यापूर्वी ते शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूरचे अर्थात सुयेकचे माजी कार्यशील अध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली होती. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन म्हणून देखील त्यांनी आपलं कार्य जबाबदारीने पार पाडले.  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ अर्थात कालवश प्रा.डॉ.जे.एफ.पाटील व आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर संशोधनात्मक कार्याला न्याय देणारे प्रा.डॉ. व्ही.बी.जुगळे हे दोघे त्यांच्या गुरुस्थानी आहेत. त्यांच्याच विचार व आचारांची पताका आपल्या अर्थशास्त्र ज्ञानाच्या व संशोधनात्मक कार्याच्या माध्यमातून सर्व दूर फडकविण्याचे काम ते सातत्याने करीत आहेत. एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक ते संवेदनशील जबाबदार नागरिक म्हणून ते परिचयाचे आहेत. आई-वडिलांच्या आशीर्वादाने,गुरूंच्या मार्गदर्शनाखाली व स्वतःच्या कर्तुत्वावर अर्थशास्त्रातील एक प्रतिभावंत व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण केली. समस्त अर्थशास्त्र प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या मध्ये हक्काचा प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. अर्थशास्त्र विषयाला योग्य न्याय देण्याचं काम त्यांनी केले.


    डॉ.अनिलकुमार वावरे हे अर्थशास्त्र विषयाचे ख्यातनाम प्राध्यापक, व्यासंगी संशोधक मार्गदर्शक आहेत. छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागप्रमुख, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक, उपप्राचार्य यासारख्या पदांची धुरा सांभाळत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे ते मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही कार्यरत आहेत. अर्थशास्त्र विषयाशी संबंधित अनेक क्रमिक पुस्तके, संदर्भग्रंथ यांचे आजवर त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी एम. फिल, पीएच.डी. संशोधन पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना शिवाजी विद्यापीठ व बॅरिस्टर पी. जी. पाटील प्रतिष्ठान यांच्यामार्फत गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२२, रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३, अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या गौरवाबद्दल त्यांचे रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, कुलसचिव डॉ. विजय कुंभार, ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, छत्रपती शिवाजी कॉलेजचे, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, यांनी अभिनंदन केले.

       अर्थशास्त्र विषयाच्या समस्त घटकांकडून प्रा.डॉ. अनिलकुमार वावरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तसेच सुयेक परिवारातील सर्व सदस्य प्राध्यापक आनंदाने भारावून गेले आहेत.डॉ. वावरे यांचा मनस्वी अभिनंदन व त्यांच्या पुढील कार्यास जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा