Breaking

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

*जैन धर्माचे तत्वज्ञान व साहित्यकृती ही प्रगल्भ अशा प्राकृत भाषेत असून सद्यस्थितीत प्राकृत भाषा शिकणे गरजेचे : प्रा. बाळासाहेब भगरे*


जयसिंगपूर कॉलेजमध्ये आचार्यरत्न श्री देशभूषण मुनिराज स्मृतिदिन व्याख्यानमालाचे १३ वे पुष्प गुंफताना प्रा. बाळासाहेब भगरे, परमपूज्य स्वस्त श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, पद्माकर पाटील, कार्यक्रम प्रवर्तक,प्रा.डॉ.जयकुमार उपाध्ये,डॉ. महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर यांचे संयुक्त विद्यमाने आचार्यरत्न श्री देशभूषण मुनिराज स्मृति व्याख्यानमालेचे १३ वे पुष्प प्रमुख वक्ते प्रा.बाळासाहेब भगरे (प्राध्यापक, प्राकृत साहित्य, शिवाजी कॉलेज सातारा) यांनी गुंफले.

      प्रा.भगरे हे प्राकृत कथा साहित्याची लोकोपयोगीता या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले,जैन धर्माचे तत्वज्ञान व साहित्यकृती ही प्रगल्भ अशा प्राकृत भाषेत असून सद्यस्थितीत प्राकृत भाषा शिकणे गरजेचे आहे. जगभरात सात हजार भाषा बोलल्या जात असून त्यापैकी प्राकृत ही एक वैदिक काळातील सर्वात महत्त्वाची प्रगल्भ अशी भाषा होती. मुळात भाषेची सुरुवात महिलांनी केली आहे. विविध प्राकृत कथेच्या माध्यमातून उत्तम जीवनशैली कशी असावी याबाबतचे मार्गदर्शन बोध कथेच्या माध्यमातून स्पष्ट होत होते. जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम या प्राकृत भाषेतून झाले. प्राकृत भाषेत १८ प्रादेशिक भाषांचा समावेश होता. तत्कालीन जैन धर्म संस्था ही प्राकृत भाषेचा विकास करण्याचे एक मुख्य मार्ग होता. तत्कालीन काळातील स्थलांतरे आणि व्यापाराच्या माध्यमातून प्राकृत भाषा विकसित होत गेली. मुळात सर्वसामान्य जनतेला तत्त्वज्ञान सहजपणे पेलत नाही यासाठी प्राकृत भाषेच्या कथांची निर्मिती झाली. उत्तम जीवन व वैचारिक परिवर्तनासाठी लोक साहित्याची गरज होती.

    व्याख्यानमाला प्रवर्तक प्रोफेसर डॉ. जयकुमार उपाध्ये हे आपली भूमिका मांडताना म्हणाले, भारतात प्राकृत भाषा ही संविधानिक भाषा म्हणून दर्जा दिला नाही. त्यामुळे प्राकृत भाषा लोप पावत आहे. आचार्यरत्न श्री देशभूषण मुनीराजांनी प्राकृत भाषेला एक वेगळा दर्जा देण्याचे काम त्या काळात केलं. तत्कालीन काळात प्राकृत भाषेला दिगंबर जैन मुनी मानत होते.  श्री देशभूषण मुनिराजनी दिल्ली दरबारी प्राकृत भाषेला विशेष दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले. सद्यपरिस्थितीत प्रगल्भ अशा जैन ग्रंथातील तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दिगंबर साहित्याची निर्मिती केली. तोच प्रचार व प्रसार करण्यासाठी आचार्य रत्न श्री देशभूषण मुनिराज स्मृति व्याख्यानमालेचा आयोजन केले असल्याबाबतची भूमिका स्पष्ट केली.

      कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.पद्माकर पाटील म्हणाले, अशा प्रकारच्या व्याख्यानाच्या माध्यमातून जैन धर्माचे तत्वज्ञानाचा प्रचार जैन व जैनत्तर घटकांमध्ये करता येत आहे.

      या कार्यक्रमास  प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, नांदणी आशीर्वचन लाभले. त्यांनी आचार्य रत्न श्री देशभूषण मुनिराज यांच्या जीवनगाथा व धर्म कार्याचा आपल्या अमूल्य वाणीतून आढावा घेतला. मुनी परंपरा व प्राकृत यासंदर्भात सदविचार व्यक्त केले. तसेच जयसिंगपूर कॉलेजचे माजी विद्यार्थी म्हणून कॉलेज व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार


    या कार्यक्रमास दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन मा.श्री.डी.ए.पाटील,  संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, प्रा. आप्पासाहेब भगाटे, अशोक शिरगुप्पे, बाळासाहेब इंगळे, बिपिन खाडे, मा.पी. आर.पाटील उपस्थित होते.

       प्रारंभी प्रा.सौ.अंजना चावरे यांनी मंगलाचरण सादर केले. प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.

      प्रा. आप्पासाहेब भगाटे यांनी परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींचा परिचय यांनी केला.पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले यांनी केला. कार्यक्रमातील उपस्थित घटकांचे आभार डॉ.सौ. सुजाता पाटील यांनी मानले.तर प्रा.सुनील चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.

     या कार्यक्रमास प्राकृत भाषेचे अभ्यासक, प्राध्यापकवृंद, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा