![]() |
श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखानाचे चेअरमन व उद्यान पंडित गणपतराव पाटील (शिरोळ) |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : भारतीय साखर उद्योगातील अमूल्य योगदानाची दखल घेऊन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची यावर्षीच्या भारतीय शुगरच्या राष्ट्रीय स्तरावरील "सहकार महर्षी पुरस्कार" साठी निवड झाली आहे. शनिवार दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी "भारतीय शुगर" द्वारे "सयाजी हॉटेल", जुना पुणे बंगलोर हायवे, कावळा नाका कोल्हापूर येथे पार पडलेल्या भारतीय शुगर सिम्पोझियमच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षी हा पुरस्कार प्रदान केला.
सहकार उद्योगाचे शिल्पकार, राज्याचे माजी मुख्यमंत्री, स्व. वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून सण 1975 साली भारतीय शुगर या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या स्थापने मागचा उद्देश हा सहकारी साखर कारखानदारीत येणारे नवनवीन तंत्रज्ञान कारखान्यापर्यंत पोहोचावे व या तंत्रज्ञानाची माहिती कारखानदारीतील प्रगत मनुष्यबळाला अवगत व्हावी असा होता. या संस्थेच्या वतीने दरवर्षी वार्षिक प्रदर्शन व परिषद आयोजित करून साखर कारखानदारी मध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना पुरस्कार देऊन गौरविले जाते.
उद्यानपंडित आणि क्षारपड मुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांनी सहकारी साखर कारखानदारी मध्ये आपले भरीव असे योगदान देत असताना शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीचे उत्पादन घेता येण्यासाठी राबवलेली ऊस विकास योजना, सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान, एकरी 200 टनाचे ऊस उत्पादन घेण्याचे तंत्र, दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारावा या हेतूने सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी केलेले प्रयत्न व शिरोळ तालुका आणि परिसरात सुमारे साडे आठ हजार एकरावर असणारे क्षारपड जमीन सुधारावे यासाठी हाती घेतलेले क्षारपड मुक्त जमीन अभियानाचे 'दत्त पॅटर्न' तसेच साखर कारखानदारी मध्ये नवीन तंत्रज्ञान राबविण्यासाठी केलेले काम, या सर्व बाबींची दखल घेऊन हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील "सहकार महर्षी पुरस्कार" हा "भारतीय साखर" चा सुवर्ण इतिहास ठरले असल्याचे मत भारतीय शुगर या संस्थेचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा