Breaking

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

*कोल्हापुरात २४ फेब्रुवारीपासून तीन दिवस स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर साहित्य संमेलन,ग्रंथ दिंडी, मान्यवरांची व्याख्याने, पुरस्कारासह विविध कार्यक्रम*

 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर


*भोलू शर्मा: जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर : स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर बहुउद्देशिय चॅरिटेबल ट्रस्ट, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळ आणि धनदायी नागरी सहकारी पत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २४ फेब्रुवारी ते सोमवार दि. २६ फेब्रुवारी अखेर साहित्यिक कवी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पाचवे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या या संमेलनात ग्रंथ दिंडी, पुरस्कार वितरण आणि सहा सत्रात विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. मिरजकर तिकटी येथील हिंदु एकता आंदोलनाच्या सभागृहात हे संमेलन होणार आहे.  ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर सोरप आणि संमेलनाचे प्रमुख संयोजक संजय कुलकर्णी यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

     संमेलनाच्या पहिल्या दिवशी दि. २४फेब्रुवारीला सकाळी साडे नऊ वाजता मिरजकर तिकटीपासून खरी कॉर्नर, बिनखांबी गणपती मंदिर, सावरकर मार्ग ते संमेलन स्थळापर्यंत सावरकरांच्या ग्रंथांची दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता हिंदूभूषण शामराव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पहिले सत्र होणार आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी (पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या या सत्रात अखिल भारत हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अँड. गोविंद तिवारी (जळगाव) यांचे सावरकरांनी दिलेली हिंदुमहासभेची ध्येय धोरणे या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी तीन वाजता हिंदुमहासभेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप यांच्या अध्यक्षतेखाली  दुसरे सत्र होणार असून यात हिंदुमहासभेचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप केणी (मुंबई) यांचे सावरकरांचे सामाजिक विचार – जात्युच्छेदक निबंध या विषयावर व्याख्यान होणार आहे.

    रविवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणा-या पहिल्या सत्रात प्रवीण बाबर (सातारा) यांचे हिंदुत्व सावरकरांचे आणि आजचे या विषयावर तर शकिल जमादार (कोल्हापूर) यांचे भारतीय मुसलमानांच्या मनातील सावरकर या विषयावर अशी दोन व्याख्याने होणार आहेत. सुभाष उर्फ आण्णा पोतदार आणि बंडा साळोखे यांच्या अध्यक्षतेकाली हे सत्र होणार आहे. दुपारी तीन वाजता निर्मला कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे सत्र होणार असून यात तिलोत्तमा खानविलकर(लांजा) यांचे सावरकरांचे महिला सबलीकरणाचे विचार या विषयावर भाषण होणार आहे.

    सोमवार दि. २६ फेब्रुवारी हा सावरकरांचा स्मृतीदिन असल्याने संमेलनातील महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी सकाळी ११ वाजता उद्योगपती नितीन वाडीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या पहिल्या सत्रात सावरकर साहित्याचे अभ्यासक आणि वक्ते आनंद कुलकर्णी (जयसिंगपूर) यांचे सावरकरांच्या साहित्यातील राष्ट्रभक्ती या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर दुपारी ३ वाजता अँड. शिवराम जोशी मुडशिंगीकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र हिंदुमहासभेचे प्रमुख कार्यवाह अँड. दत्ता सणस (सातारा) यांचे सावरकरांचे अर्थशास्त्र विषयक विचार या विषयावर भाषण होणार आहे. त्यानंतर संमेलनाचा समारोप होणार आहे. या संमेलना दरम्यान सावरकर विचारांसाठी आणि हिंदुत्वासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा हिंदू भूषण, हिंदू मावळा असे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

    या संमेलनाला महाराष्ट्रभरातून सावरकर प्रेमी उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या नियोजनासाठी समिती तयार करण्यात आली असून गोपाळ कुलकर्णी उचगावकर हे कार्याध्यक्ष तर आनंद कुलकर्णी (जयसिंगपूर) हे स्वागताध्यक्ष आहेत. संजय कुलकर्णी, शिवरामपंत जोशी, नितीन वाडीकर, मनोहर सोरप, नंदकुमार घोरपडे, राजेंद्र शिंदे, जयवंत निर्मळ, शरद माळी, विक्रांत ढवळे यांच्यासह हिंदुमहासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांचा या समितीत समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा