Breaking

सोमवार, २५ मार्च, २०२४

*तरुणांनी उद्योजकतेचा ध्यास घेऊन खडतर परिश्रमाने स्वतःला सिद्ध करावे : प्रसिद्ध उद्योगपती संजय जी घोडावत*

 

उद्योगपती संजय जी घोडावत व अन्य मान्यवर

*प्रा.डॉ.महावीर बुरसे : उपसंपादक*


सांगली : तरुणांनी खडतर परिश्रमाने उद्योजकतेचा ध्यास घेऊन स्वतःला सिद्ध करावे असे प्रतिपादन भारतातील सुप्रसिद्ध उद्योजक मा.संजय घोडावत यांनी केले. भारतीय युवा शक्ती ट्रस्ट व एचडीएफसी बँकेच्या वतीने आयोजित 'माझा उद्योजकीय प्रवास' या विषयावर ते वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. त्यांनी आपल्या भाषणात आपला उद्योजकीय प्रवास सर्व विद्यार्थ्यांच्या समोर उलगडला. 

     सुरुवातीला वडिलांच्याकडून बारा लाख रुपये घेऊन व्यवसाय सुरू केला पण तो चालला नाही . सुरुवातीच्या काळात टेम्पो मधून प्रवास करून  मालं विकण्याचा प्रयत्न केला. हॉटेल परवडत नव्हते म्हणून रात्री टेम्पोमध्येच झोप घेतली. इतके खडतर अनुभव येत असतानाही स्वतःवरील विश्वास मात्र कधीही ढळू दिला नाही. त्याचेच फळ आज भारतामधील एक नामांकित उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले आहे. आज टाटांच्या नंतर मिठापासून एअरलाइन्स पर्यंत उद्योगांमध्ये असणारे संजय घोडावत हे नाव फक्त सचोटी, प्रामाणिकपणा, ध्येयानुरूप वाटचाल, नियोजनबद्ध विकास, सतरा सतरा तास काम करण्याची तयारी, भविष्याकडे पाहण्याचा दूरगामी दृष्टिकोन, व विश्वासू लोकांची साथ यामुळेच आहे असे ते म्हणाले. आपला उद्योजकीय प्रवास विद्यार्थ्यांच्या समोर उलगडताना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रापासून ते एअरलाइन्स तेल मीठ इत्यादी सर्वच क्षेत्रात आज घेतलेली भरारी याचे कारण केवळ सुयोग्य नियोजन व खडतर परिश्रम यालाच दिले.

     जे.आर. डी. टाटा यांनी सुरू केलेल्या भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या संस्थेच्या कामाबद्दलही त्यांनी सन्मानाची भावना बोलून दाखवली. भारतीय युवाशक्ती ट्रेकच्या माध्यमातून आज देशभरामध्ये सोळाशे कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले गेले आहे व हजारो उद्योजक आपले व्यवसाय यांच्या मदतीने चालवत आहेत. त्यासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्यरत असणारे मेंटर हे त्यामध्ये विकासात्मक व मोलाची भूमिका बजावत आहेत.

   अत्यंत उत्साहाने पार पडलेल्या या कार्यक्रमांमध्ये एचडीएफसी बँकेचे क्लस्टर हेड प्रदीप हावणे,वालचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे इन्चार्ज डायरेक्टर डॉ . उदय दबडे, मा. सतीश वाघ डॉ. संचेती , मा. संजय जी परमने, डॉ.सुहास खांबे , विलिंगडन महाविद्यालय सांगलीचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनोहर कोरे, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ प्रभाकर माने इत्यादी सन्माननीय मेंटर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला. 

   सरतेशेवटी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत व विद्यार्थ्यांच्या मनातील उद्योजकते विषयी असणाऱ्या भ्रामक कल्पना व त्याविषयीची गुंतागुंत सोडवत कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा