Breaking

बुधवार, २० मार्च, २०२४

*दीर्घकालीन गुंतवणुक व नफ्यासाठी शेअर मार्केट हा एक उत्तम पर्याय : डॉ. मनोहर कोरे यांचे प्रतिपादन*

 

मार्गदर्शन करताना डॉ. मनोहर कोरे, अध्यक्ष डॉ.माधव मुंडकर व अन्य मान्यवर डॉ. पांचाळ, डॉ. प्रभाकर माने 

*भोलू शर्मा : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने हीरक महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विलिंग्डन कॉलेज, सांगलीचे,डॉ. मनोहर कोरे व अध्यक्षस्थानी नाईट कॉलेज खंजिरे, इचलकरंजी चे डॉ. माधव मुंडकर लाभले होते.

     शेअर बाजार व गुंतवणूक या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते डॉ. मनोहर कोरे म्हणाले, पूर्वी शेअर मार्केट हा विशिष्ट राज्यातील व समुदायातील घटकांचा व्यवसाय बनला होता. शेअर मार्केट विषयी अपूर्ण माहिती व आर्थिक नुकसान होईल या भीतीने शेअर मार्केटमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित होती. परंतु कालानुरूप शेअर बाजाराबाबत सर्व प्रकारच्या माध्यमातून होणारा प्रचार आणि प्रसार तसेच विविध ठिकाणी शेअर बाजाराचे ऑनलाइन व ऑफलाइन कार्यशाळा यामुळे देशातील अनेक घटक याविषयी जागृत झाला. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजाराचा फायदा उठवण्यासाठी सर्व घटक सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक गुंतवणूकदारांनी अल्पकाळात अधिक नफा मिळवण्यासाठी इंट्रा-डे मार्केटचा वापर करीत आहे. परंतु शेअर मार्केट विषयी अभ्यासाचा अभाव व नियोजन शून्य गुंतवणूकीमुळे अनेकांना नुकसानीस सामोरे जावे लागते.

     डॉ. कोरे पुढे म्हणाले, सुज्ञ गुंतवणूकदार हा भविष्याचा विचार करीत असतो. त्यानुसार गुंतवणूकदारानी विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये दीर्घकालीन व सुज्ञ पद्धतीच्या हेतूने केलेली गुंतवणूक ही लाभदायक ठरते. यापुढे विद्यार्थ्यांनी शेअर मार्केटकडे एक व्यवसाय म्हणून पाहणे गरजेचे आहे त्यासाठी योग्य त्या अभ्यासाची व अनुभवाची आवश्यकता आहे.

      अध्यक्ष स्थानावर बोलताना डॉ.माधव मुंडकर म्हणाले, शेअर मार्केट हा व्यवसाय सुज्ञ गुंतवणूकदारांना नफा मिळवून देणारा आहे यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे. यावेळी डॉ. पांचाळ यांनी शेअर मार्केट विषयी माहिती देऊन प्रबोधन केले.

       या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रभाकर माने यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.सौ. विश्रांती माने यांनी मानले. सूत्रसंचालन कु. माधुरी कोळी यांनी केले.

     सदर कार्यक्रमास प्रेरणा, सहकार्य व उत्तम मार्गदर्शन प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे लाभले. या कार्यक्रमास अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने, डॉ. वंदना देवकर, प्रा. कु. माधुरी कोळी, प्रा.सौ. विश्रांती माने,प्रा.कु.यास्मिन मुल्ला तसेच एम.ए. व बी. ए. अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा