Breaking

बुधवार, १३ मार्च, २०२४

*परीक्षेतील सुयश हे नियोजनबद्धता, स्मार्टपणा व कष्टप्रद अभ्यासावर अवलंबून : डॉ. प्रभाकर माने यांचे प्रतिपादन*


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते डॉ. प्रभाकर माने,अध्यक्ष डॉ. मनोहर कोरे, प्रा.अनिल खर्चे ,प्रा.सौ. गळवणी ,प्रा. कु. माधुरी कोळी व प्रा. संदीप चव्हाण उपस्थित होते.


*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*


सांगली : विलिंग्डन महाविद्यालय, सांगली व जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामंजस्य करार अंतर्गत (MOU) सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालयीन कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रभाकर माने,अध्यक्षस्थानी डॉ. मनोहर कोरे व प्रा. माधुरी कोळी उपस्थित होत्या.

     सदर कार्यशाळेत 'परीक्षेला सामोरे जाताना' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते डॉ. प्रभाकर माने   म्हणाले, मुळात परीक्षा हे शैक्षणिक वर्षातील आपण केलेल्या अभ्यासाचा एक अनिवार्य व महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे त्याविषयी अनावश्यक भीती बाळगू नये. उलटपक्षी परीक्षेला सामोरे जाताना आपला विषय व परीक्षेवर नितांत श्रद्धा ठेवून सामोरे जावे. परीक्षेत किती टक्के गुण प्राप्त होतात, यश किंवा अपयश हे आपण केलेले कष्टप्रद अभ्यास व प्राप्त परिस्थितीवर अवलंबून असते.

     डॉ.माने पुढे म्हणाले, परीक्षेतील सुयश हे आपण निश्चित केलेले उद्दिष्ट,जिद्द, चिकाटी व नियोजनबद्ध. केलेला अभ्यास यावर अवलंबून आहे. यासाठी त्यांनी ७ मार्ग सांगितले.

परीक्षेला सामोरे जात असताना खालील ७ बाबीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

१) वेळापत्रकाचे नियोजन करून काटेकोर पालन करावे.

२) परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोबाईल फोन, आकर्षित करणारा इतर गोष्टी व मित्रापासून दूर राहा.

३) अभ्यास करताना सोयीनुसार विषयाचे प्राधान्यक्रम निश्चित करावे.

४) अभ्यास करताना थोडा ब्रेक घेणे गरजेचे आहे.

५) मनावर नियंत्रण ठेवणे व पर्याप्त झोप घेणे गरजेचे आहे.

६)  स्वंयमशिस्त असावी व वेळोवेळी गुरुजनांचे मार्गदर्शन घ्यावे.

७) काढलेल्या नोटसचे वाचन पुन्हा पुन्हा करावे.

   सरते शेवटी ते म्हणाले, अलीकडच्या काळात परीक्षेत यशस्वी होणे सोपे बनले आहे यासाठी आत्मविश्वासाची गरज आहे.

      अध्यक्ष स्थानावर बोलताना डॉ. मनोहर कोरे म्हणाले, परीक्षेचा अभ्यास हा वाचन, चिंतन, मनन, पाठांतर व सराव या पंच सूत्री वर अवलंबून असतो. यासाठी परीक्षार्थीनी अत्यंत कष्टप्रद अभ्यास न करता स्मार्ट पद्धतीने अभ्यास करणे गरजेचे आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सांगोपांग चर्चा झाली.याप्रसंगी प्रा. कु. माधुरी कोळी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

   सुरुवातीस जयसिंगपूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजची ऐतिहासिक लायब्ररी व अन्य परिसर दाखवण्यात आला. यावेळी कु. अंजली माळी, श्री. मयुरेश माने, श्री. स्वानंद तेलंग कु. प्रेरणा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यशाळा आयोजकांचे आभार मानले.

        प्रारंभी रोपट्यास जल अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. संदीप चव्हाण यांनी केले.  प्रा.सौ. गुळवणी यांनी आभार मानले.उत्तम सूत्रसंचालन प्रा. अनिल खर्चे यांनी केले. 

      सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विलिंग्डन महाविद्यालय, सांगली चे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर व जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे मार्गदर्शन, प्रेरणा व सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमास शुभेच्छा देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

    या कार्यशाळेस विलिंग्डन महाविद्यालय, सांगली व जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा