![]() |
अर्थ विश्व या भीती पत्रकाचे उद्घाटन व विकसित भारत@२०४७ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. महेंद्र बागुल, प्राचार्य डॉ.धनंजय कर्णिक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप रावळ व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या जयसिंगपूर येथील श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर येथे मंगळवार दि. ५ मार्च, २०२४ रोजी अर्थशास्त्र विभागामार्फत ‘अर्थविश्व’ या भित्तिपत्रकाचे उद्घाटन व विकसित भारत@२०४७ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मा. प्रा. डॉ. महेंद्र बागुल(फर्ग्युसन कॉलेज, पुणे) यांनी विद्यार्थिनींना उत्तम मार्गदर्शन केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. धनंजय कर्णिक उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. महेंद्र बागुल म्हणाले, विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात मूलभूत व पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असून शासनाच्या हमीद्वारे विकासाच्या दिशेने अर्थव्यवस्था मार्गक्रमण करीत आहे. देशातील युवकांच्या साथीने, सरकारच्या क्रांतिकारक योजना, सर्वस्पर्शीय विकास व दीर्घकालीन धोरणात्मक बदलामुळे सन २०४७ पर्यंत भारत देश विकसित होईल असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. सद्यस्थितीत शासनाच्या माध्यमातून मेड इन इंडिया,मेक इन इंडिया, मुद्रा योजना, सागरमाला, स्टार्ट अप इंडिया, फ्रेट कॉरिडोर व MSEM या सारख्या नवीन योजनेच्या माध्यमातून भारताला सक्षम करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे दिसून येत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी आशा व्यक्त केली.
प्राचार्य डॉ. धनंजय कर्णिक यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थिनींना सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात कसे आणता येईल याविषयी सांगोपांग मार्गदर्शन केले.
कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. संदीप रावळ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अर्थशास्त्र विभागातील प्रा. सुप्रिया कोगनोळे यांनी करून दिला. या कार्यक्रमासाठी बी. ए. भाग- ३ व बी. कॉम.-भाग ३ मधील अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. सुरज कचरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा