Breaking

शनिवार, १५ जून, २०२४

*जयसिंगपूरात युवा उद्योजक निर्माण करणारी 'भारतीय युवा शक्ती ट्रस्टची शाखा' सुरू*

  

भारतीय युवा शक्ती ट्रस्ट : शाखा- जयसिंगपूर 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : भारतीय युवा शक्ती ट्रस्ट हि एक 'ना नफा ना तोटा' या तत्वावर सेवाभावी वृत्तीने काम करणारी व युवा उद्योजक निर्माण करणारी राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संस्थेची शाखा जयसिंगपुरात सुरू झाली आहे.  ही संस्था वंचित स्तरातील युवक आणि युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तथा सुरु असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक सहाय्य व मार्गदर्शन पुरवते आणि योग्य तो सल्ला देते. 

      रोजगार मागणाऱ्यांना रोजगार निर्माते बनविणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सन १९९२ साली प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या प्रेरणेतून व भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची स्थापना झाली. संस्थेच्या विश्वस्तपदी भारतातील अत्यंत नामवंत उद्योगपतींचा समावेश असून प्रसिद्ध उद्योगपती माजी अध्यक्ष स्वर्गीय राहुल बजाज हे आधारस्तंभ व मिस लक्ष्मी वेंकटेशन या फाऊंडींग अँड मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. सुबोध भार्गवा (टाटा कम्युनिकेशन, माजी अध्यक्ष) आहेत. संस्थेच्या कॉर्पोरेट भागीदारीमध्ये टाटा, बजाज, गोदरेज, जे. के. पेपर्स, जे. पी. मॉर्गन आदी राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय उद्योगसमूहांचा समावेश आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) संस्थेची धोरणात्मक भागीदार आहे. 

     भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या माध्यमातून वंचित वर्गातील युवा उद्योजकांना संस्थेच्या भागीदार असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांच्या द्वारे विनातारण, विनाजामीन अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. वय वर्ष १८ ते ३५ या वयोगटातील उद्योजक पात्र असतील व उत्पादन, सेवा व व्यापार या क्षेत्रातील व्यवसायांना मदत केली जाईल.  याशिवाय उद्योजकांना समुपदेशन, दोन दिवसीय उद्योजकता प्रशिक्षण, मेंटर/विश्वासु सल्लागारांमार्फत व्यवसाय वृद्धीसाठी २ वर्ष मार्गदर्शन, नेटवर्किंग, मेळावे व पुरस्कार यासारख्या सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. ज्यामुळे उद्योजक स्वयंपूर्ण होऊन यशस्वीपणे व्यवसाय चालवू शकतील आणि समाजासाठी आपले योगदान देऊ शकतील. 

  जर आपल्याला व्यवसायात पदार्पण करावयाचे असेल अथवा चालू व्यवसाय सुस्थितीत आणण्यासाठी मार्गदर्शन हवे असेल तर खालील पत्ता व मोबाईलवर संपर्क साधावा. 

      भारतीय युवा शक्ती ट्रस्ट, इंद्रादी बिल्डिंग, गल्ली नंबर ५, श्री स्वामी समर्थ टायर्स जवळ, जयसिंगपूर ४१६१०१

मो. ९९७०८५८५०९ (श्री. प्रदीप पाटील)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा