Breaking

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०२४

*प्रा.आदिनाथ तातोबा ऐनापुरे हे महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक पुरस्काराने सन्मानित*


प्रा. आदिनाथ तातोबा ऐनापुरे यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करताना माजी ब्रिगेडीयर सुधीर सावंत व अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर : शुक्रवार, दिनांक ०८ नोव्हेंबर २०२४ रोजी महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक या ठिकाणी प्रा. आदिनाथ तातोबा ऐनापुरे यांना 'महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक पुरस्कार-२०२४' ने सन्मानित झाले.महाराष्ट्राचे माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष व सेवानिवृत्त माजी ब्रिगेडियर मा. सुधीर सावंत यांच्या हस्ते सन्मानपत्र, ट्रॉफी व शाल प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले.याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष मा. व्यंकटराव जाधव, प्रदेश सचिव प्राचार्य गोपीनाथ सगर, प्रदेश कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील,प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. सखाराम वाघमारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

     पुणे स्थित महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेने त्यांची आजपर्यंतची सामाजिक व शैक्षणिक गुणवत्तापूर्ण कामगिरीचा विचार करून  त्यांना सन्मानपत्र प्रदान केले.सदर सन्मान पत्रांमध्ये महाराष्ट्र क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांनी शैक्षणिक व सामाजिक क्रांतीत नवे मनवंतर घडविले, अखिल मानवाच्या व महिलांच्या जीवनामध्ये  शैक्षणिक, शेती विषयक व सामाजिक क्रांती केली. महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र या भूमिकेतून कार्य करते व या भुमिकेने कार्य करणा-यांना प्रेरणा देण्याचे कार्य करते. महात्मा ज्योतीराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार देवून आपला सन्मान करतांना आमचे हात समृध्द होत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपले कार्य समाज आणि राष्ट्र समृध्दीसाठी उपयुक्त होवो. यासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

     प्रा. आदिनाथ ऐनापुरे हे जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे  गणित विषयाचे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मूळचे शिरोळ तालुक्यातील मौजे अकिवाट गावचे सुपुत्र असून आई-वडिलांनी दिलेले संस्कार व गुरुजनांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी आपला यशस्वी जीवनपट निर्माण केला. लहानपणापासून गणित हा  विषय आवडीचा असल्याने  या विषयातून त्यांनी एम.एस्सी. पदवीव्युत्तर पदवी व लगेच बी.एड. ही पदवी संपादन केली. जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर या ठिकाणी सन २०१३ साली रुजू झाले. विषयाचे सखोल ज्ञान,अभ्यासू व्यक्तिमत्व व विद्यार्थी प्रिय स्वभावाचे असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून अध्यापनाचे कार्य सुरू ठेवले. तसेच जादा तासाच्या माध्यमातून गणित विषयातील कमजोर विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. गेल्या एक दशकात गणित विषयातील तज्ञ प्राध्यापक म्हणून शिरोळ तालुक्यात आपली ओळख निर्माण केली.याचबरोबर धार्मिक स्वभावाचे असल्याने भगवान महावीर व तीर्थंकरांनाचे तत्त्वज्ञान- शिकवणीनुसार आपली दिनचर्या ते पूर्ण करतात. सामाजिक संवेदनशील असल्यामुळे त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करून सामाजिक जबाबदारी पार पाडली  आहे. वृक्षारोपण, सामाजिक प्रबोधन, रक्तदान व अन्य सामाजिक उपक्रमामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. गरीब व हुशार होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी विविध पद्धतीने मदत केली आहे.प्रा. ऐनापुरे यांच्या या यशात त्यांची सुविद्य पत्नी सौ. ऐनापुरे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

    अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील व संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे, कार्यालयीन अधीक्षक ए.बी. कांबळे, सिनियर व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व प्राध्यापक वृंद व प्रशासकीय सेवक व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा