Breaking

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५

*क्रीडा, संस्कृती आणि शिक्षण हीच सर्वांगीण विकासाची त्रिसूत्री : माजी खासदार राजू शेट्टी*

 

मा. खासदार राजू शेट्टी मार्गदर्शन करताना, अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष अडदंडे,डॉ. महावीर अक्कोळे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व अन्य मान्यवर 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी, २०२५ रोजी कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. खासदार राजू शेट्टी व अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष अडदंडे होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील व  प्राचार्य डॉ.सुरत मांजरे उपस्थित होते.

     मा.राजू शेट्टी मार्गदर्शन करताना म्हणाले, या संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांची मला जाण आहे. आजच्या या सोहळ्यात सहभागी होताना मला अत्यंत आनंद होत आहे.आज विद्यार्थ्यांनी मेहनतीच्या जोरावर इथे उभे आहात. पारितोषिक हे तुमच्या कष्टांचे फळ आहे, पण खरा विजय हा शिकण्यात आणि सातत्याने प्रगती करण्यामध्ये आहे. आज यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि ज्यांना आज पारितोषिक मिळाले नाही, त्यांनाही मी सांगू इच्छितो—पराभव हा केवळ पुढील यशाचा टप्पा असतो. कठोर परिश्रम, सातत्य आणि चिकाटी हेच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहेत.

   अध्यक्ष स्थानावर बोलताना डॉ. सुभाष अडदंडे म्हणाले, शिक्षण हे केवळ गुण मिळवण्यासाठी नाही, तर व्यक्तिमत्त्व विकासासाठी असते. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कौशल्य आणि जीवनमूल्ये आत्मसात करत राहा.याप्रसंगी एपीआय दीपक कदम व एपीआय प्रविण माने यांनी कायदेविषयक मौलिक मार्गदर्शन केले.

  यावेळी शैक्षणिक, सांस्कृतिक, एन.सी.सी, एन.एस.एस. व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रमाणपत्र, शिल्ड व अन्य स्वरूपात पारितोषिक पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी अहवाल वाचन उपप्राचार्य प्रा.डॉ.काळे,प्रा.डॉ चौगुले,प्रा.डॉ. सूर्यवंशी व प्रा.पाटील यांनी केले.

    प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.एस.आर.नकाते यांनी केला. आभार प्रा.भारत आलदार यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप तापकीर यांनी केले.

    या कार्यक्रमास संस्थेचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य,प्राध्यापकवृंद, प्रशासकीय सेवक - कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा