Breaking

बुधवार, ३० जुलै, २०२५

*अनेकांत स्कूल म्हणजे गुणवत्ता व ध्यासपूर्ण शिक्षणाचा मार्ग व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सचिव डॉ. महावीर अक्कोळे*


 अनेकांत स्कूलची माहिती देताना संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे,प्रा. अप्पासाहेब भगाटे, मॅनेजर अभिजीत अडदंडे, प्राचार्य डॉ. मांजरे, मुख्याध्यापक प्रिया गारोळे, कल्याणी अक्कोळे व शिल्पा अडदंडे


*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलची विविध शैक्षणिक आघाड्यांवर घोडदौड चालू असतानाच स्कूलचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे यांच्या नेतृत्वाखाली स्कूल प्रगतीच्या एका नव्या वळणावर उभे असून लवकरच शाळेला सी.बी.एस.ई. ची मान्यता मिळेल अशी खात्री अनेकांतचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी व्यक्त केली. पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले, २०१७ साली अवघे दहा विद्यार्थी व पाच शिक्षकांसह चालू झालेल्या या स्कूलमध्ये आज तब्बल १०३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

    संचालक प्रा. अप्पासाहेब भगाटे म्हणाले की, अगदी प्री प्रायमरी पासून ते बारावी सायन्स-कॉमर्स पर्यंतच्या उत्कृष्ट शिक्षणाची सोय असलेल्या अनेकांत मध्ये ऑलिंपियाड, होमी भाभा, ॲलन, स्कॉलरशिप, अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उत्तम तयारी करून घेतली जाते, आणि त्यासाठी स्मार्ट क्लास, अत्याधुनिक प्रयोगशाळा, छोट्यांसाठी खास क्रीडो लॅब अशा सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मॅनेजर अभिजीत अडदंडे, प्रिन्सिपल प्रिया गारोळे, शैक्षणिक समन्वयक कल्याणी अक्कोळे आणि शिस्त पालन कमिटी प्रमुख शिल्पा अडदंडे यांच्या अथक प्रयत्नातून हे यश साध्य झाले असेही ते  म्हणाले.

     प्रिन्सिपल प्रिया गारोळे यांनी सांगितले की २०१८  पासून अनेक विद्यार्थ्यांनी ऑलिंपियाड, होमी भाभा आदी स्पर्धांमध्ये गोल्ड, सिल्व्हर, ब्राॅन्झ आणि झोनल मेडल्स  पटकावले आहेत. सहीम पटवेगार व साहिलकुमार  भोगुलकर या विद्यार्थ्यांनी फायनल लेवल पर्यंत जाऊन उत्तुंग भरारी मारली आहे. स्कॉलरशिप परीक्षेत पटवेगार राज्यात बारावा तर सुजय दानोळे याने जिल्ह्यात सहावा क्रमांक पटकाविला. 

     शैक्षणिक समन्वयक कल्याणी अक्कोळे यांनी तिसरीत शिकणाऱ्या आर्यन अवताडे या चिमुकल्याने सिंगापूर येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये चौथा क्रमांक पटकावून जागतिक पातळीवर अनेकांचे झेंडा फडकवला याची माहिती दिली. दहावी व बारावीचा निकाल गेली तीनही वर्षे १००% लागला असून मेहेक मुल्ला, श्रावणी देशपांडे, खुशी मिश्रा या विद्यार्थ्यांनी शिरोळ तालुक्यात इंग्लिश मिडियम कॉमर्स विभागात प्रथम क्रमांक पटकावला. खुशी मिश्रा ही इंग्रजी विषयात बोर्डात पहिली आली. 

   शाळेचे मॅनेजर अभिजीत अडदंडे यांनी स्कूलमध्ये व ज्युनियर कॉलेजमध्ये आयआयटी, नीट, जेईई तयारीसाठी अनेकांत सायन्स अकॅडमी, गायनासह विविध प्रकारच्या वाद्ये व संगीत शिक्षणासाठी अनेकांत म्युझिक अकॅडमी, स्केटिंग, स्विमिंग, रोबोटिक्स, कोडींग, फार्मिंग अशा विविध खेळ व उपक्रमासाठी खास सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. शिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा, दिमाखदार वार्षिक स्नेहसंमेलन, समर कॅम्प, अवकाश दर्शन, विज्ञान प्रकल्प स्पर्धा, ट्रेड फेअर इत्यादी उपक्रम राबविले जातात. यावर्षीच्या ट्रेड फेअर मध्ये तब्बल दोन लाखांची उलाढाल होऊन विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, नफा-तोटा आदी व्यवहारांची माहिती झाली असेही अडदंडे यांनी सांगितले.

   या पत्रकार परिषदेला संचालक आदिनाथ नरदे, जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, प्रा. डॉ.प्रभाकर माने,  शिस्तपालन कमिटी प्रमुख सौ. शिल्पा अडदंडे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा