![]() |
पालक सभेत मार्गदर्शन करताना बालरोग तज्ञ डॉ. रियाज अत्तार,सोबत डॉ. महावीर अक्कोळे, अभिजीत अडदंडे, मुख्याध्यापिका प्रिया गारोळे व कल्याणी अक्कोळे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षण देणारी एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) प्रतिबंधक लस ही सुरक्षित असून कॅन्सरमुक्तीकडे एक सकारात्मक व सुरक्षित पाऊल आहे, असे मत सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. रियाज अत्तार यांनी व्यक्त केले.ते अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर येथे एचपीव्ही लसीकरणाबाबत आयोजित पालक मार्गदर्शन सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे होते.
यावेळी डॉ. अत्तार यांनी सर्वाइकल कॅन्सरची माहिती देत ही लस कशी उपयुक्त आहे, याचे शास्त्रीयदृष्ट्या विवेचन केले. “या लसीकरणामुळे मुलींचे आरोग्य सुरक्षित होईल. 9 ते 18 वयोगटातील मुलींनी ही लस अवश्य घ्यावी,” असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. महावीर अक्कोळे यांनी सांगितले की, “सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यार्थिनींसाठी ही लस शाळांमधून मोफत देण्यात येत आहे. लसीकरणाच्या माध्यमातून कॅन्सर प्रतिबंध शक्य आहे, हे लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.”
या मार्गदर्शन सभेमध्ये पालकांच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले. लसीकरणासाठी सहमतीपत्र भरून देण्याचे आवाहन शाळेच्या अध्यापिका द्राक्षायणी लंगरे यांनी केले. यावेळी सूत्रसंचालन धनश्री हराळे यांनी केले.
कार्यक्रमास शाळेचे मॅनेजर अभिजीत अडदंडे, मुख्याध्यापिका प्रिया गारोळे, शैक्षणिक समन्वयक कल्याणी अक्कोळे, राखी पाटील, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा