![]() |
मयत विद्यार्थिनी गायत्री पंढरीनाथ रेळेकर(भूगोल) |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात भूगोल प्रथम वर्षाची विद्यार्थिनी गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय २१, रा. सांगलीवाडी, सांगली) हिने सोमवारी दुपारी साडेबारा ते दोनच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेचा क्रम :
गायत्री वसतिगृह क्र. १ मधील रूम क्रमांक ५४ मध्ये इतर दोन मैत्रिणींसह राहत होती. ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान ती सांगलीवाडी येथे घरी गेली होती. सोमवारी सकाळी ९ वाजता ती सांगलीहून कोल्हापुराकडे रवाना झाली. सकाळी ११.३० वाजता तिने वडिलांना सुखरूप पोहोचल्याचा फोन केला. त्यानंतर ती वसतिगृहात परतली.
दुपारी भूगोल विभागातील तिची मैत्रीण वर्ग संपवून वसतिगृहात आली असता खोलीचा दरवाजा बंद होता. अनेकदा हाक मारून व दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद मिळाला नाही. मोबाईलवरही संपर्क साधता आला नाही. शेवटी इतर विद्यार्थिनींच्या मदतीने खिडकीतून पाहिले असता गायत्रीने फॅनला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. तत्काळ वसतिगृह अधीक्षक, सुरक्षारक्षक व विद्यार्थिनींनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, मात्र तोपर्यंत ती मृत अवस्थेत होती.
घटनास्थळी अधिकारी व पोलिसांची धाव :
घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सरगर, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. तानाजी चौगले, सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यांनी वसतिगृहात भेट देऊन माहिती घेतली.
शव विच्छेदनासाठी शेंडा पार्क येथील रुग्णालयात नेण्यात आला. तेथे तिच्या आई-वडिलांसह बहिणींनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. आत्महत्येचे कारण मात्र रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
कुटुंबाचा पार्श्वभूमी :
गायत्री ही सांगलीवाडीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. वडील पंढरीनाथ रेळेकर यांचे कापड दुकान असून तिला चार बहिणी आहेत. काही दिवसांपूर्वी ती गावी गेली होती. परत आल्यावर काही तासांतच तिने टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि मैत्रिणींना मोठा धक्का बसला आहे.
राजारामपुरी पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा