Breaking

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

*जयसिंगपूरात रेबीजचा कहर : पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी वृद्ध महिलेचा मृत्यू: पालिका प्रशासनाविरुद्ध संताप**


 मयत रेखा सुभाषचंद्र गांधी वय 71

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  शहरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याने एक वृद्ध महिलेचा जीव घेतला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील रेखा सुभाषचंद्र गांधी (वय 71) यांचा आज पहाटे रेबीजने मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

     २९ ऑक्टोबर रोजी रेल्वे स्टेशन परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवून रेखा गांधी यांना गंभीर जखमी केले. त्याच कुत्र्याने त्या दिवशी आणखी पाच जणांना चावा घेतला होता, तसेच कुत्र्याला हुसकावण्याच्या प्रयत्नात एक तरुण देखील जखमी झाला. याशिवाय परिसरातील सात वर्षीय मुलीवर देखील या कुत्र्याने हल्ला करून तिला जखमी केले होते.या सर्व घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे  सावट पसरले आहे.

    जखमी रेखा गांधी यांनी घटनेनंतर सांगली सिव्हिल रुग्णालयात रेबीजविरोधी लसीकरण घेतले होते. मात्र तब्येत बिघडत गेल्याने त्यांना बुधवारी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांच्यात रेबीजची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना तातडीने गुरुवारी पहाटे सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या मुलगा ॲड. निलेश गांधी यांनी दिली.

      कुत्र्याने चावा घेतलेल्या उर्वरित पाच जणांचा शोध प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यांना तातडीने लसीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आणि जखमी व्यक्तींचा तातडीने शोध लावण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

   या घटनेनंतर जयसिंगपूर शहरात दहशत आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबद्दल प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

     जनतेचा वाढता रोष व सामाजिक संघटनेच्या दबावामुळे  पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यावर निर्बीजीकरण आणि लसीकरणाची मोहीम हाती घेतली होती. 

       या घटनेने जयसिंगपूर शहरात पालिका प्रशासना विरुद्ध नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा