Breaking

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

*जयसिंगपूर कॉलेजच्या संशोधनाला कोरियन पेटंटची मान्यता*


 जयसिंगपूर कॉलेजच्या संशोधनाला पेटंटची मान्यता देताना दक्षिण कोरियाचे प्रो. ड्यू की किम, सोबत प्रा. डॉ. संदीप साबळे  व प्रथमेश चौगले व अन्य मान्यवर

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक* 


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज, देवचंद कॉलेज अर्जुननगर आणि सेजाँग युनिव्हर्सिटी (कोरिया) यांच्यातील संयुक्त संशोधनाला कोरियन सरकारकडून प्रतिष्ठेचे पेटंट प्राप्त झाले असून, या उल्लेखनीय कार्यात जयसिंगपूरचा संशोधक विद्यार्थी प्रथमेश चौगले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

         फेराइट सुपर पॅरामॅग्नेटिक नॅनो पार्टिकल्स युजिंग शुगरकेन ज्यूस फ्युएल फॉर इंडक्शन/कम्बशन सिंथेसिस या नवोन्मेषी विषयावर हे संशोधन पार पाडण्यात आले. ऊसाच्या रसाचा इंधन (फ्युएल) म्हणून वापर करून नॅनो पार्टिकल्स तयार करण्याची ही पद्धत कमीत कमी खर्चात, अल्प वेळेत आणि अत्यंत प्रभावी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तयार झालेले हे फेराइट नॅनो पार्टिकल्स हायड्रोजन निर्मितीसाठी उपयुक्त ठरू शकतात, ज्यामुळे भविष्यातील स्वच्छ ऊर्जानिर्मितीला मोठी चालना मिळू शकते.

      या संशोधनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रो. ड्यू की किम (कोरिया), डॉ. संदीप साबळे आणि डॉ. अविनाश रामटेके यांनी मार्गदर्शन केले. संशोधन कार्यादरम्यान स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत प्रथमेश चौगले यांची कोरियातील सेजाँग युनिव्हर्सिटीमध्ये एक महिन्यांच्या संशोधनासाठी निवड झाली होती, त्यांनी हे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले.

   या संशोधन पथकात संशोधक विद्यार्थी प्रथमेश चौगले, अक्षता पट्टनशेट्टी, महेश बुरुड आणि विजय चव्हाण यांचा सहभाग होता.

      या यशाबद्दल अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, जयसिंगपूर  कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, देवचंद कॉलेजचे फिजिक्स विभाग प्रमुख डॉ. एस. डी. पाटील, प्राचार्य जी. डी. इंगळे, तसेच जय शिवराय सोसायटीचे सेक्रेटरी माजी खासदार संजय मंडलिक व ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी अभिनंदन करून पुढील संशोधन व कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा