Breaking

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

*“राजकारणात पदे मिळतात कट्टरांना, मात्र नेत्याला साथ देतात फक्त निष्ठावंतच”*

 

 निष्ठा सेवेची - निष्ठा नेत्याच्या विचारांची व कृतीची 


 लेखक : श्रेणिक चौगुले, जयसिंगपूर ( राजकीय विश्लेषक) 


     आजच्या बदलत्या काळात निष्ठा हा शब्द उच्चारला तरी लोकांच्या ओठांवर हसू उमलते. कारण सध्या कट्टर असणे फॅशन झाले आहे.गट बदलला तर कट्टर बदलतो, नेता बदलला तर कट्टरची दिशा बदलते. कट्टरता ही राजकीय हवामानाप्रमाणे परिवर्तनशील आहे. परंतु निष्ठा मात्र परिवर्तनशील नसते; ती व्यक्ती आणि विचाराशी बांधलेली असते. म्हणूनच निष्ठावंत व्यक्तीला या परिभाषा, या फॅशनेबल कट्टरतेचे तत्त्वज्ञान कधी कळतही नाही किंवा कळले तरी तो ते जाणीवपूर्वक नाकारतो. कारण त्याच्यासाठी निष्ठा ही व्यवहार नव्हे, ती भावनिक बांधिलकी असते.

    निष्ठावंताला आपल्या नेत्याच्या भवतालची दलदल दिसत नसते असे नाही. त्याला स्पष्टपणे जाणवत असते की काही लोक आपल्या स्वार्थासाठी त्या दलदलीत उभे राहून फक्त आपला कार्यभाग साधत आहेत. पण निष्ठावंत मात्र त्या दलदलीत उतरून स्वार्थाचे वेच घेण्यासाठी जन्माला आलेला नसतो. तो आपली सामाजिक व राजकीय नैतिक मूल्ये सांभाळत राहतो. नेत्याशी अत्यंत निष्ठेने सलगी ठेवतो.

       आजच्या बदलत्या राजकारणात बर्‍याचदा नेत्याच्या आजूबाजूचे बेगडी प्रेम दाखविणारे, कृत्रिम निष्ठा दर्शविणारे, दिखाऊ मात्र स्वयंघोषित कट्टर गल्ली बोळातले नेते , आढ्यतेचे, फोटोबाजीवर जगणारे, स्वतःची स्वच्छ व उच्च कोटीची प्रतिमा उभी करण्यासाठी समाज माध्यमाच्या द्वारे कार्यरत राहणारे तथाकथित कट्टर कार्यकर्ते हे बळाच्या जोरावर निष्ठावंताला हुसकावून लावतात. कारण त्याची उपस्थिती त्यांचा दिखावा फोल ठरवते.

     निष्ठा ही प्रकाशासारखी असून ती खोटेपणाला उघडे पाडत असते म्हणूनच निष्ठावंताला हटवणे, दुर्लक्षित करणे, अथवा त्याची प्रतिमा मलिन करणे हा सोपा पर्याय निवडला जातो.

     नेताही हे सर्व पाहतो. त्याला माहीत असते की कोण खरे आहे आणि कोण मुखवट्यांमध्ये जगत आहे. परंतु राजकारणाचे बंधन, परिस्थितीचे दडपण आणि आंतरिक राजकारणाचा विळखा यामुळे तो निष्ठावंताला तातडीने न्याय देऊ शकत नाही. मात्र हे दोघे अर्थात नेता आणि निष्ठावंत—हे  दोन्ही जाणतात. म्हणूनच संकटातही एकमेकांना सोडून जात नाहीत. निष्ठा ही एकदा दिली की ती परिस्थितीप्रमाणे बदलत नाही. ती संकटात अधिकच दृढ होते.

निष्ठावंताला दररोज भेटीगाठींची गरज नसते. तो सतत फोटो, पोस्ट, कौतुक किंवा मंचावरची जागा याच्या मागे लागत नाही. तो नेहमी सावलीत काम करत असतो—कार्य हेच त्याचे परिमाण समजून त्याच्यासाठी मान-अपमान गौण ; कर्तव्य हेच सर्वोच्च मानत असतात. नेत्याने आदेश देण्याआधीच तो जबाबदारी स्वीकारून पुढे सरसावतो.

परंतु दुर्दैव असे आहे की जेव्हा संधीचे द्वार उघडते, तेव्हा निष्ठेपेक्षा विरोधी बाकावरचे, तात्पुरता लाभ मिळवून देणारे किंवा ‘हवे त्या वेळी हजर’ राहणारे लोक महत्त्वाचे ठरतात. निष्ठा मागे पडते आणि कट्टरता पुढे सरकते.तरीही—निष्ठावंत निष्ठाच निवडतो.

     कारण त्याच्यासाठी निष्ठा ही केवळ व्यक्तीशी नव्हे, तर मूल्यांशी, तत्त्वांशी, विचारांशी आणि संबंधांच्या पवित्रतेशी असते. त्याचा प्रवास एकाकी असू शकतो; संघर्षमय असू शकतो; कौतुकापेक्षा अधिक दुर्लक्षित असू शकतो. तरीही त्याची निष्ठा अविचल असते.

     निष्ठावंताचे अस्तित्व जगात कमी असले, तरी त्या तुटपुंज्या प्रकाशातच समाजातील सत्य, विश्वास आणि दीर्घकालीन नात्यांचे अस्तित्व टिकून असते. कट्टरता क्षणभंगुर असते; निष्ठा मात्र शाश्वत.कारण शेवटी—निष्ठावंत हा निष्ठेलाच महत्त्व देतो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा