![]() |
| नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवार कसा असावा? |
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
प्रस्तावना :
... महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणूक 2025 चे नगरपरिषद व नगरपंचायतिच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. संपूर्ण महाराष्ट्रात 3 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे हे समजताच त्याच्यावर नजर ठेवलेल्या विविध राजकीय पक्षाच्या सत्ताधारी, विरोधक नेत्यांनी, स्थानिक आघाड्यानी, अपक्षांनी व हौसेघोषानी आपापल्या उमेदवाराच्या नावाची यादी जाहीर करू लागली. मात्र या यादीमध्ये उमेदवार निवडीचे निकष काय? पैसा, जात,धर्म, आणि लोकप्रियता ( हुकूमशाही पद्धतीची असली तरी चालेल), विरोधाला विरोध म्हणुन, महत्वकांक्षापायी, भविष्यातील आमदारकीवर मजबूत पकड ठेवण्याच्या उद्देशाने बहुतांशी राजकीय पक्ष व स्थानिक आघाड्यांनी उमेदवारी दिली. मात्र प्रगल्भ अशा लोकशाही प्रणालीत तो उमेदवार कसा असावा? याचा यत किंचितही विचार न करता बहुतांशी नगराध्यक्ष व नगरसेवक या पदासाठीची उमेदवारी सत्तेसाठी व सोयीनुसार दिली आहे. खरंच अशा गोष्टीमुळे भारतीय लोकशाही टिकेल व सक्षम होईल का हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. मुळात नगराध्यक्ष किंवा नगरसेवक कसा असावा याचा कोणी विचार केला आहे का? अर्थात तो नागरिकांनी/ मतदारांनी विचार करावा. त्यानुसारच योग्य उमेदवाराची निवड करावी हे अपेक्षित असते. कारण नगरसेवक पद हा व्यवसाय किंवा धंदा नसून याच्यामध्ये एवढे पैसे गुंतवले की भविष्यामध्ये इतके उत्पन्न मिळेल. याचा विचार करून उमेदवाराकडून प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे.
खऱ्या अर्थाने नगरपरिषद किंवा नगरपंचायत एखाद्या शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू असतो. शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध असलेली अनेक कामे ; स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, प्रकाशयोजना, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, बाजारपेठ, उद्याने, वाहतूक—ही सर्व कामे नगर परिषद सांभाळते. त्यामुळे नगर परिषदेचा उमेदवार हा केवळ निवडून येण्यासाठी नव्हे, तर शहराचे रूपांतर घडवण्यासाठी तयार असणारा असणे आवश्यक आहे. यासाठी काही विकासात्मक व रचनात्मक निकष आदर्शवत उमेदवारांच्या अनुषंगाने सांगितले आहेत.
१. स्वच्छ प्रतिमा व प्रामाणिक नेतृत्व :
उमेदवाराची प्रतिमा पारदर्शक, स्वच्छ व विश्वासार्ह असावी. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अनुचित फायदा घेतल्याच्या आरोपांपासून दूर राहणारी व्यक्तीच नागरिकांचा दीर्घकालीन विश्वास जिंकू शकते. अशा उमेदवाराकडून निर्णय प्रक्रियेतही नैतिकता आणि पारदर्शकता अपेक्षित असते.
२. जनसंपर्कक्षम व समाजात मिसळणारा :
1) नेतृत्वाचा पाया म्हणजे लोकांशी जोडले जाणे. चांगला उमेदवार हा सहज उपलब्ध असतो.
2) प्रत्येक घटकांमध्ये सहभागी होतो,
3) वृद्ध, महिला, तरुण, शेतकरी, व्यापारी, कामगार अशा सर्वांचे प्रश्न जवळून समजून घेतो.
4) नागरिकांची भाषा समजणारा आणि त्यांच्या समस्यांबद्दल सहानुभूती बाळगणारा उमेदवार अधिक परिणामकारक ठरते.
३. शहराच्या गरजांची सखोल समज असावी.
प्रशासनात जाणाऱ्या व्यक्तीला शहराच्या मूलभूत गरजांचे भान असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ:
1) पाणीपुरवठा योजना आणि त्यातील तांत्रिक अडचणी
2) रस्त्यांचे जाळे व वाहतूक नियोजन
3) कचरा संकलन आणि प्रक्रिया प्रकल्प
4) आरोग्य व स्वच्छता व्यवस्थापन,
5) शहरातील नाले, जलनिस्सारण, पूरस्थिती व्यवस्थापन करणे.
या सर्वांची जाण असल्यास उमेदवार वास्तववादी नियोजन करू शकतो.
४. विकासदृष्टी आणि दीर्घकालीन नियोजन :
फक्त आजची समस्या नव्हे, तर पुढील १०–१५ वर्षांचे शहर कसे असावे हे ठरवण्याची दृष्टि आवश्यक आहे. चांगल्या उमेदवारामध्ये:
1) रस्ते, उद्याने, बाजारपेठ, वसाहती, औद्योगिक क्षेत्र यांचा दीर्घकालीन आराखडा,
2) शाश्वत विकासाची जाणीव (पाणी, हरितपट्टे, पर्यावरण),
3) डिजिटल नगरपरिषद, स्मार्ट सोल्यूशन्स यांचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.
५. जननिष्ठा व समाजहिताचा दृष्टीकोन :
1) पक्षनिष्ठेपेक्षा जननिष्ठा महत्त्वाची. निर्णय घेताना पक्षाचा दबाव टाळून नागरिकांचे हित पुढे ठेवणे आवश्यक आहे.
2) तटस्थतेने निर्णय घेणे, सर्व समाजघटकांना समान वागणूक देणे हे आवश्यक आहे. जननिष्ठ उमेदवार प्रशासनात लोकांना न्याय देतो.
६. जबाबदारी, शिस्त आणि तत्परता :
1) चांगल्या उमेदवाराची काम करण्याची शैली व्यावहारिक आणि शिस्तबद्ध असते.
2) वेळेचे महत्व पाळणारा असावा.
3) नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवणे,
4) बैठका, तपासण्या, क्षेत्रभेटी यांना प्राधान्य देणे.
ही त्याची ओळख असते.कामाचा वेग आणि अंमलबजावणीची क्षमता नसल्यास विकास थांबतो.
७. तरुण, महिला आणि वृद्धांसाठी संवेदनशीलता :
एक प्रगत शहर हे सर्व घटकांना सोयीस्कर असते. म्हणून उमेदवाराने विचार करावा:
1) युवकांसाठी क्रीडा व रोजगार संधी देणे.
2) महिलांसाठी सुरक्षितता, आरोग्य सुविधा, उद्याने, बाजारपेठ सुविधा निर्माण करणे.
3) ज्येष्ठ नागरिकांसाठी सार्वजनिक ठिकाणे, वाचनालये व आरोग्य केंद्रे निर्माण करणे.
समाजातील दुर्बल घटकांच्या गरजांवर लक्ष देणारा उमेदवार अधिक प्रभावी ठरतो.
८. संवादकौशल्य, नेतृत्वक्षमता आणि व्यवस्थापन कौशल्य :
नगर परिषदेचे काम म्हणजे फक्त आदेश देणे नव्हे, तर:
1) अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार, नागरिक, समाजसंस्था यांच्यात समन्वय साधणे.
2) निधी मिळवण्यासाठी शासनाशी संवाद साधणे.
3) प्रकल्पांचे नियोजन,अंमलबजावणी आणि देखरेख करणे.
यासाठी उत्कृष्ट संवादकौशल्य आणि व्यवस्थापन क्षमता आवश्यक आहे.
९. तंत्रज्ञानातील जाण व आधुनिक विचार :
आजकाल नगर परिषदेचे काम डिजिटल पद्धतीने चालते. त्यामुळे उमेदवाराने:
1) इ-गव्हर्नन्स,
2) स्मार्ट सिटी संकल्पना,
3) ऑनलाइन सेवा,
4) GIS मॅपिंग,
पाणी/कचरा/वाहतूक व्यवस्थापनातील नवतंत्रज्ञान
याची माहिती असावी.
१०. पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाची भूमिका :
शहराचा विकास पर्यावरणपूरक असणे गरजेचे आहे. उमेदवाराने पुढील गोष्टींचा विचार करणे आवश्यक:
1)वृक्षारोपण, जलसंधारण, प्लास्टिकबंदी,
2) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प,
3) स्वच्छ व हरित उपक्रम,
4) नदी-नाले स्वच्छता मोहिमा.
यामुळे शहराचे आरोग्य उत्तम राहते. नगर परिषदेचा योग्य उमेदवार म्हणजे प्रामाणिक, लोकाभिमुख, सक्षम आणि दूरदर्शी व्यक्ती होय. जो फक्त निवडून येण्यासाठी नव्हे, तर शहराची जबाबदारी स्वीकारून ते खऱ्या अर्थाने समृद्ध करण्याची तयारी दाखवतो.
अशा उमेदवाराची निवड झाल्यास शहरातील सुविधा सुधारतात, नागरिकांचे जीवनमान उंचावते आणि विकासाला गतिमान दिशा मिळते. उज्वल भारतासाठी व लोकशाही बळकटीसाठी आदर्शवत उमेदवार असावा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा