![]() |
| जयसिंगपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक : 2025 |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मंगळवार, दि. 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेली मतदान प्रक्रिया शांततेत आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायतींपैकी सर्वात कमी मतदानाचा कल जयसिंगपूर नगरपरिषदेत दिसून आला आहे. येथे एकूण 49,721 मतदारांपैकी फक्त 35,102 मतदारांनी अर्थात टक्केवारीत 70.60% इतके मतदान झाले आहे. यावेळी सुमारे 14 हजार पेक्षा अधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे.
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही जयसिंगपूर शहरातून कमी मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे शहराच्या लोकशाही सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यावेळी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानात थोडी वाढ झाली असली, तरी एकूणच उत्साह कमीच असल्याचे आकडेवारी दर्शवते.
मतदानाच्या दिवशी कोणतीही मोठी अडचण अथवा तांत्रिक अडथळा नोंदला गेला नाही. तरीदेखील अनेक मतदारांनी मतदान केंद्राकडे जाण्याचा प्रयत्नच न केल्याने नागरिकांमध्ये वाढत चाललेली अनास्था चिंताजनक असल्याचे जाणवते.
तसेच जयसिंगपूर नगरपरिषद प्रशासनाने मतदान जनजागृतीसाठी केलेल्या उपक्रमांमध्ये पुरेशी परिणामकारकता दिसून आली नाही. शालेय-विद्यापीठीय पातळीवरील उपक्रम,रांगोळी, रॅली, घराघरांतून जनजागृती, युवा गटांचे सहभाग अभियान अशा उपक्रमांमध्ये काटेकोर नियोजनाची कमतरता जाणवली, असे नागरिकांचे मत आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हा मूलभूत घटक असल्याने केवळ नागरिकच नव्हे तर प्रशासनावरही पुढील निवडणुकांमध्ये मतदार सहभाग वाढवण्याची तितकीच जबाबदारी येते. नागरी समस्या सोडविण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा दर्जा उंचावण्यासाठी मतदारांचा अधिकाधिक सहभाग अत्यावश्यक असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.
जयसिंगपूरमध्ये झालेल्या कमी मतदानाची दखल घेऊन भविष्यात प्रशासनाने तातडीने प्रभावी जनजागृती मोहीम राबवावी, तसेच मतदारांपर्यंत थेट पोहोचून मतदानाची गरज पटवून द्यावी, अशी भावना सामाजिक संघटना व जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा