Breaking

शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५

*जयसिंगपूरच्या मालू हायस्कूल मध्ये ८३ वा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न*

 

  क्रीडा महोत्सवाच्या  उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना भारतश्री रविंद्र आरते, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मालू, चंद्रकांत जाधव, प्रमुख पाहुणे बी. ए. जोंग, मुख्याध्यापक सयाजीराव पाटील,क्रीडा शिक्षक व्ही. एम.चव्हाण व अन्य मान्यवर


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 जयसिंगपूर : येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल, जयसिंगपूर येथे ८३ वा वार्षिक क्रीडा महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या क्रीडा महोत्सवाला आंतरराष्ट्रीय खेळाडू भारतश्री डॉ. रवींद्र शिवाजी आरते तसेच मिस्टर युनिव्हर्स भारत श प्रथमेश रवींद्र आरते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. क्रीडा महोत्सवासाठी नवजीवन प्रशालेचे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक बी. ए. जोंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मालू व सदस्य चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

   प्रमुख पाहुणे डॉ. रवींद्र आरते यांनी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच क्रीडा, सकस आहार व नियमित व्यायामाकडे लक्ष द्यावे, असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात राजेंद्र मालू यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्यावा व त्याचा आनंद घ्यावा, क्रीडेमुळे शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो, असा संदेश दिला.

    प्रशालेचे मुख्याध्यापक सयाजीराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक सतीश चिपरीकर यांनी करून दिला. शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.

    एन.सी.सी. कॅडेट्स व खेळाडूंसह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवतीर्थावर क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही क्रीडाज्योत प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्याकडे प्रदान करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ. रवींद्र आरते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. क्रीडा शिक्षक  व्ही. एम. चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली, तर  बी. ए. जोंग यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले.

      या क्रीडा महोत्सवात स्विमिंग, बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्समधील सर्व प्रकार (हर्डल्स, भालाफेक, हॅमर थ्रो, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, तीन हजार मीटर चालणे व धावणे), बुद्धीबळ, बॉक्सिंग अशा वैयक्तिक तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, खो-खो, बास्केटबॉल अशा सांघिक स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. स्पर्धेदरम्यान शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी हलगी वादन करून क्रीडा महोत्सवाला विशेष रंगत आणली. या महोत्सवात शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विविध स्पर्धांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. बी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. एस. व्ही. हजारे यांनी केले. क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा