![]() |
| अर्थशास्त्र स्वायत विभागाची कार्यशाळा संपन्न |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील स्वायत्त अर्थशास्त्र विभागाच्या वतीने सॉफ्ट घटक अंतर्गत “Elevate Your Career: Mastering Soft Skills and Communication” या विषयावर दिनांक १६ व १७ डिसेंबर रोजी दोन दिवसीय सॉफ्ट स्किल्स व करिअर विकास विषयक कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. एम. एस. देशमुख, प्रभारी अधिष्ठाता, मानव्यविद्या शाखा व विभागप्रमुख, अर्थशास्त्र विभाग (स्वायत्त) यांनी भूषविले. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. ए. बी. साळी, प्रभारी अधिष्ठाता, आंतरविद्याशाखीय अध्ययन शाखा, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर उपस्थित होते. त्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात शैक्षणिक ज्ञानाबरोबरच संवादकौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास व सॉफ्ट स्किल्स यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी तांत्रिक सत्र–१ मध्ये डॉ. अरविंद जाधव, प्राध्यापक, इंग्रजी विभाग, यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालय, कराड यांनी “स्व-जागरूकता निर्माण करणे आणि मूलभूत संवादकौशल्यांमध्ये प्रावीण्य मिळवणे” या विषयावर मार्गदर्शन केले. आत्मजाणीव, भावनिक बुद्धिमत्ता, प्रभावी संवाद, ऐकण्याची कला व आत्मविश्वास वृद्धी याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
त्यानंतर तांत्रिक सत्र–२ मध्ये डॉ. मानसिंग ठोंबरे, सहायक प्राध्यापक, इंग्रजी विभाग, विश्वासराव नाईक कला, वाणिज्य व बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय, शिराळा (सांगली) यांनी “सहकार्य, संघकार्य आणि वाटाघाटी” या विषयावर मार्गदर्शन केले. संघकार्य, नेतृत्वगुण, संघर्ष निवारण व वाटाघाटी कौशल्यांचे व्यावहारिक महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी तांत्रिक सत्र–३ मध्ये प्रा. ए. एम. गुरव, माजी विभागप्रमुख, वाणिज्य विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी “करिअर यशासाठी व्यावसायिकता” या विषयावर व्याख्यान दिले. व्यावसायिक शिस्त, कार्यनिष्ठा, वेळेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण आत्मविकास यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
तांत्रिक सत्र–४ मध्ये श्री. इरशाद वडगावकर, वरिष्ठ संशोधक, सेंटर फॉर रशियन स्टडीज, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), नवी दिल्ली यांनी “परदेशी भाषा : संवादातील एक नवी दिशा” या विषयावर मार्गदर्शन केले. जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर परदेशी भाषांचे महत्त्व, उपलब्ध करिअर संधी व बहुभाषिकतेची गरज त्यांनी स्पष्ट केली.
कार्यशाळेच्या समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे प्रा. ए. व्ही. गुरव, प्रभारी अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान शाखा, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर होते. अध्यक्षस्थान प्रा. डॉ. एम. एस. देशमुख यांनी भूषविले. यावेळी श्री. एस. पी. पंचगल्ले व डॉ. दादा ननवरे उपस्थित होते.
संपूर्ण कार्यशाळा अत्यंत माहितीपूर्ण व संवादात्मक ठरली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून व्यावहारिक कौशल्यांचा लाभ घेतला. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दिग्विजय पाटील यांनी दोन दिवसीय कार्यशाळेचा संक्षिप्त अहवाल सादर करून सर्व मान्यवर, मार्गदर्शक व सहभागी यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण करिअर विकासासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा