Breaking

शनिवार, १० जानेवारी, २०२६

*वारकरी संतसंप्रदाय समाजाला लोकशाही,समता, बंधुता आणि जातिभेद निर्मूलनाची दिशा देणारा  : ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर  महाराज*

कालवश डॉ. अक्कोळे स्मृती  व्याख्यानमालेत बोलताना ह भ प ज्ञानेश्वर बंडगर महाराज,
 डॉ. सुभाष अडदंडे, डॉ. महावीर अक्कोळेडॉ. राजेंद्र कुंभार, डॉ. अजित बिरनाळे  व प्राचार्य डॉ. मांजरे  

*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : समाजाला समता, बंधुता व जातविरहित दृष्टिकोन देणारा वारकरी संत संप्रदाय हा केवळ आध्यात्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांनी केले.

      ते जयसिंगपूर स्थानिक समिती, जयसिंगपूर कॉलेज व अक्कोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत बोलत होते. 

     मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “एक ज्योत एक मशाल” या तत्वाप्रमाणे वैज्ञानिक व विवेकवादी दृष्टिकोन जपणारा वारकरी संप्रदाय समाजात समतेची जाणीव रुजवतो. या संप्रदायात जात-धर्माला स्थान नसून मानवतेवर आधारित विचारधारा आहे.ज्ञानेश्वर महाराज यांनी मुस्लिम समाजातील लतीफ महाराज व वजीर खान यांच्या गाथांचा उल्लेख करत संप्रदायाची समन्वयक भूमिका स्पष्ट केली.

     ते पुढे म्हणाले, वारकरी परंपरेत ब्राह्मण संतांनी दलितांच्या घरी जाऊन भोजन करणे, संत स्त्रियांना समान दर्जा देणे, संत चोखोबांची संत जनाबाईंनी घेतलेली बाजू ही समतावादी विचारांची ठळक उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले. संतांना जात-वर्ग महत्त्वाचा नसून त्यांना फक्त पंढरीची ओढ असते, असेही ते म्हणाले.आजच्या काळात तुकाराम महाराजांच्या अभंगांवर बंदी आणणाऱ्या पेशवाईवर वारकरी संप्रदायातील मोरोपंतांनी केलेली कठोर टीका ही सामाजिक अन्यायाविरोधातील आवाज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संतांचा मार्ग सोपा, प्रबोधनात्मक असून सर्व समाजघटकांवर समता व बंधुतेचा सकारात्मक प्रभाव पाडणारा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष अडदंडे होते. संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व अधीक्षक संजय चावरे उपस्थित होते.

  स्वागत व प्रास्ताविक डॉ. महावीर अक्कोळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. राजेंद्र कुंभार यांनी करून दिला, तर आभार डॉ. अजित बिरनाळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाळगोंडा पाटील व प्रा. अंजना चावरे यांनी केले.

      या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला शेकडो श्रोते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा