Breaking

शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६

नोकरीपेक्षा उद्योजकतेतून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य शक्य : संदीप शेडबाळे

 

 कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आर्थिक व कर सल्लागार संदीप शेडबाळे, डॉ. महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व अन्य


पूजा कांबळे : विशेष प्रतिनिधी


जयसिंगपूर : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ नोकरीच्या चौकटीत अडकून न राहता उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे करिअर घडवणे अधिक शाश्वत व उज्ज्वल ठरू शकते, असे प्रतिपादन जयसिंगपूर येथील आर्थिक व कर सल्लागार संदीप शेडबाळे यांनी केले. ते जयसिंगपूर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘युवकांसाठी उद्योजकता विकास व विविध शासकीय योजना’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होते.

    या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे व प्रा. डॉ. विजयमाला चौगुले व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर माने उपस्थित होते.

     मार्गदर्शन करताना शेडबाळे यांनी उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक टप्पे, आर्थिक नियोजन तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. प्रधानमंत्री मुद्रा योजना, अण्णासाहेब पाटील महामंडळ, स्टार्टअप इंडिया व मेक इन इंडिया या योजनांच्या माध्यमातून तरुणांनी उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

     अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मांजरे म्हणाले की, ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक असून त्यांच्या करिअरला नवा आयाम देणारी आहे.

    कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुंभार यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. वंदना देवकर यांनी मानले. सूत्रसंचालन रफिया रांगोळे व पूजा कांबळे यांनी केले. या कार्यशाळेस अधीक्षक संजय चावरे, प्रा. विश्रांती चव्हाण, प्रा. मेहबूब मुजावर, प्रा. ज्योती चोपडे व प्रा. गणेश कुरले व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा