![]() |
| व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना प्रेरकवक्ते व संविधानप्रेमी पैगंबर शेख (पुणे), अध्यक्ष. डॉ. सुभाष अडदंडे, डॉ. महावीर अक्कोळे, डॉ. राजेंद्र कुंभार, डॉ. अजित बिरनाळे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर राजकीय व सामाजिक भांडवल म्हणून वापर होऊ न देता धर्मांधतेच्या विरोधात पुरोगामी विचारांच्या बाजून राहिले पाहिजे असे मत पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रेरक वक्ते पैगंबर शेख यांनी “छत्रपती शिवराय ते राजर्षी शाहू : सलोख्याचा प्रवास” या विषयावर मार्गदर्शन करताना मांडले. ते जयसिंगपूर स्थानिक समिती,जयसिंगपूर कॉलेज व अक्कोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत बोलत होते.
मार्गदर्शन करताना शेख म्हणाले, शिवाजी महाराजांचा संघर्ष मुस्लिमांशी नव्हे तर जावळीच्या मोरेंशी दीर्घकाळ चालू होता कारण मोरे हे आदिलशहाची जहांगिरी करीत होते ; मात्र स्वार्थी शक्तींनी हिंदू-मुस्लिम संघर्षाचा चुकीचा इतिहास मांडल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पन्हाळा-पावनखिंड लढाईतील सिद्धी वाहवाह, प्रतापराव गुजरांसोबत लढणारे सिद्धी हिलाल यांसारख्या मुस्लिम वीरांचे योगदान दुर्लक्षित केले जात असल्याची टीका त्यांनी केली. आग्र्यातून शिवाजी महाराजांची सुटका करणारे मदारी मेहतर हे मुस्लिम होते, याचाही विसर पडल्याचे त्यांनी नमूद केले.
धर्मग्रंथापेक्षा संविधानाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. अकबराने नाण्यावर राम-सीतेची प्रतिमा छापली, टिपू सुलतानने अंगठीवर ‘राम’ शब्द कोरले,अमर शेखांनी शिवपोवाडे गाणे, मोहम्मद रफी यांचे रामभक्तीपर गीत यांचा दाखला देत हिंदू-मुस्लिम सलोख्याची परंपरा त्यांनी अधोरेखित केली. कट्टर हिंदू व कट्टर मुस्लिम विचारसरणीच्या विरोधात पुरोगामी विचारांची गरज असल्याचे सांगत “नको मटण, हवं शिक्षण” असा संदेश देत शिक्षण व प्रबोधनावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. बुरखामुक्त चळवळ अधिक सक्षमपणे राबविण्याचा प्रयत्न करणार आहे हे देखील त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष अडदंडे होते. संस्थेचे पदाधिकारी, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, प्राचार्य डॉ. सुरत मांजरेया प्रबोधनात्मक कार्यक्रमाला डॉ. अजित बिरनाळे, माजी मुख्याध्यापक देसाई, कवडसा फाउंडेशनचे अध्यक्ष शुक्राचार्य उर्फ बंडू उरुणकर व अधीक्षक संजय चावरे यांचे विशेष सहकार्य लाभले. ,
स्वागत व प्रास्ताविक डॉ. महावीर अक्कोळे यांनी केले. वक्ते पैगंबर शेख यांचा सत्कार कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे यांच्या हस्ते करण्यात आला.पाहुण्यांचा परिचय डॉ.राजेंद्र कुंभार यांनी करून दिला, तर आभार कल्याणी अक्कोळे यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा. सुनिल चौगुले यांनी केले
या कार्यक्रमास जयसिंगपूर, कुरुंदवाड, सांगली व शिरोळ मधील असंख्य श्रोत्यांनी हजेरी लावली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा