Breaking

शनिवार, ११ एप्रिल, २०२६

*क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले : शिक्षण, समता आणि मानवतेचे खरे विश्वपुरुष*

 

 क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले 


 *लेखक प्रा. डॉ. प्रभाकर तानाजी माने

 जयसिंगपूर, मोबाईल नं. 9823120076


          जगातील काही मोजक्या समाजसुधारकापैकी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. महात्मा फुले म्हणजे समाजसुधारकांच्या रांगेतील परिपक्व समाजधुरीण होय. शैक्षणिक बदल व प्रवाह सुधारण्याच्या प्रवासातील असंख्य शिक्षणतज्ञांचा महामेरू, बळीराजाचे नेतृत्व करणारा व मातीशी नाळ जोडलेल्या, शेती प्रगतीसाठी अव्याहतपणे विचाराधीन असलेले व कृतिशील कार्यातून शेती सुधारक, प्रगतिशील शेतकरी व कृषी पंडित म्हणून सुप्रसिद्ध होते. तत्कालीन हिंदुस्थानामध्ये जात, धर्म, पंथ, लिंग व क्षेत्र यांना कोणताही थारा न देता थोर मानवतावादी दृष्टीतून पाहणारा मानवतावादी सुधारक तसेच समाजातील वंचित घटकांसाठी व समाजव्यवस्थेने शूद्र व अशुद्र अशा प्रकारची निर्माण केलेली व्यवस्था मोडून काढणारा बंडखोर समाज क्रांतिकारक होय. शूद्रातिशूद्रांचा तारणहार, शैक्षणिक चळवळीच्या प्रवासातुन महिलांना व शूद्रांना शैक्षणिक प्रवाहात आणणारा चळवळीचे खरेखुरे शिक्षक व शिलेदार आहेत. आपल्या लेखन कौशल्याच्या माध्यमातून विविध ग्रंथाची निर्मिती करून समाजामध्ये जाणीव जागृती करून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, इंग्रजी व्यवस्थेला प्रगतशील व पुरोगामी व्यवस्था निर्माण करण्यास भाग पाडणारा जातिवंत शूर शिलेदार म्हणून त्यांची ओळख सर्वश्रुत आहे.

        ज्योतिराव गोविंदराव फुले या महात्म्याचा जन्म सन ११ एप्रिल १९२८ मध्ये आई चिमणाबाई व वडील गोविंदराव यांच्या पोटी झाला. गोविंदराव फुले यांनी वयाच्या ७ व्या वर्षी ज्योतिराव फुले यांना शाळेत पाठवले परंतु अल्पकाळात तत्कालीन व्यवस्थेमुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. मात्र त्यानंतर गफार बेग मुंशी आणि मेजर लिजिट साहेब यांनी गोविंदरावांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन ज्योतिरावांना सन १८४१ मध्ये मिशनरीच्या इंग्लिश शाळेत दाखल करण्यात आले. या मिशनरीच्या शाळेतून म. फुलेंच्या राजकीय सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक मनाची परिपक्क घडणजडण झाली. त्यामुळे जोतीरावांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मिळालेली ही सकस शिदोरी सातत्याने समाजकारणी उपयोगी पडू लागली. तसेच थॉमस पेन व छ. शिवाजी महाराजांच्या विचाराने ते प्रभावित होते.

    कालांतराने सर्व क्षेत्रात आलेला अनुभव व शिक्षणामुळे निर्माण झालेली परिपूर्ण परिपक्वता यामुळे समाजातील पददलित, वंचित घटक व बहुजन समाजाचे अज्ञान व असमानता दूर केल्याशिवाय त्या समाजाला माणुसकीचे जीवन प्राप्त होणार नाही हे ओळखले होते. तसेच समाजात स्त्री शिकल्याशिवाय त्या कुटुंबाला व समाजाला अर्थ प्राप्त होणार नाही हे त्यांनी ओळखून त्यांनी जाणीवपूर्वक १८४८ मध्ये पुण्यात बुधवार पेठेतील भिडे यांच्या बाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. लगेच सन १८५१ ला दुसरी मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अस्पृश्य समाजासाठी शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी सन १८५१ मध्ये नाना पेठेत शाळा सुरू केली तसेच १८५५ मध्ये रात्र शाळा सुरू करून त्यांनी शिक्षणाविषयीचा आपला हेतू व भूमिका स्पष्ट केली. या त्यांच्या समग्र शिक्षण प्रवासात सन १८८२ रोजी बहुजन समाजास शिक्षण प्राप्त व्हावे व त्यास चालना मिळावी यासाठी हंटर आयोगासमोर त्यांनी साक्ष दिली.

   तसेच त्यांनी सामाजिक चळवळीत कार्य करीत असताना सन १८६३ ला बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून व पुनर्विवाहास चालना देण्यासाठी सन १८६४ मध्ये शेणवी जातीत पहिला पुनर्विवाह घडवून आणला. तसेच त्यांनी महिला हितार्थ व कल्याणासाठी विविध मार्गाने पत्नी सावित्रीबाई व स्वतः जोतीराव फुले यांनी संघर्षमय प्रवास केला. तसेच अस्पृश्य समाजाच्या सोयीसाठी व बहुजनांचा आधारु या भावनेने त्यांनी सन १८६८ ला आपल्या वाड्यातील पाण्याचा हौद खुला केला. त्यांचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण असल्यामुळे त्यांनी राजकारणात प्रवेश करून पुणे नगरपालिकेचे सदस्य पदापासून ते महापौर पदापर्यंतचा प्रवास बहुजन हिताय व कौतुकास्पद होता.

     म. ज्योतिबा फुले यांनी शूद्रातिशूद्र लोकांचे हाल, शेतकऱ्यांची भयावह स्थिती, महिलांचे समाजातील दुय्यम स्थान, सामाजिक परिस्थिती बदलणे यासाठी एखादी अखंड चालणारी चळवळ उभी राहिली पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर सन १८७३ ला 'सत्यशोधक समाज' स्थापन केला. या समाजाचा वैचारिक मूलाधार खालील प्रमाणे होता.

१. ईश्वर एकच असून तो सर्वव्यापी निर्गुण, निर्विकार व सत्यरूप आहे.

२. ईश्वराची भक्ती करण्यास प्रत्येक मानवास पूर्ण अधिकार असून यासाठी भट दलालांची आवश्यकता नाही.

३. कोणीही व्यक्ती जातीने श्रेष्ठ नसून फक्त गुणाने श्रेष्ठ ठरतो.

   आपल्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने म. फुलेनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. ही मां ग्रंथसंपदा बहुजन हिताय होती हे मात्र सत्य आहे. यामध्ये १) तृतीय कला, १८५५ २) ब्राह्मणांचे कसब, १८६१ सत्यधर्म. १८९१८) छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा ९) असंख्य काव्यरचना इ. चा समावेश होतो. ३) गुलामगिरी, १८७३४) शेतकऱ्यांचा आसूड, १८८३ ५) सतसार, १८८५ ६) इशारा, १८८५७) सार्वजनिक

    महात्मा ज्योतिराव फुले यांचे शैक्षणिक कार्य :

     ज्योतिराव फुले यांची शैक्षणिक कार्यपद्धती ही स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारलेली होती. त्यामुळे शुद्र व बहुजन समाजाला सामाजिक, वैचारिक व मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी तसेच समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी शिक्षण हा या व्यवस्थेचा मूळ गाभा असून त्याच्यावरच समाजाच्या विकास व प्रगतीची चौकट बळकट होत असते. यासाठी शिक्षणाची ज्ञानगंगा ही घरोघरी पोहचविणे गरजेचे असून या शिवाय समाज परिवर्तन होणार नाही हे महात्मा फुले यांनी ओळखलेले होते. यासाठी शूद्रातिशूद्रासाठी शिक्षणाचा अट्टाहास लावला होता. यासाठी विविध ग्रंथाच्या माध्यमातून अर्थात 'ब्राह्मणांचे कसब', 'अखंडादी काव्यरचना' व 'विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी' या लिखाणाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण प्रसाराचे कार्य केले होते. महात्मा फुले हे महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणून ओळखले जात होते. ते मानवतावादी समाजसुधारक असल्यामुळे मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीस विरोध करून शिक्षण हे वरच्या वर्गापासून ते खालच्या वर्गापर्यंत पाझरत आले पाहिजे यास त्यांचा कडाडून विरोध होता. त्यांच्या मते शिक्षण हे खालच्या वर्गातील लोकांना देऊन नंतर वरच्या वर्गातील लोकांना द्यावे म्हणजे 'आधी कळस मग पाया' असं न होता 'आधी पाया मग कळस' अशा पद्धतीने शिक्षणप्रणाली असण्याबद्दल महात्मा फुले यांचा प्रचंड आग्रह होता. यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारच्या हंटर आयोगासमोर शूद्रातिशूद्र व शेतकऱ्यांच्या शिक्षणाची कैफियत मांडून शिक्षणाबद्दलचे आपले विचार स्पष्ट केले.

    त्यांनी सामाजिक व आर्थिक शोषणाचा पंचनामा करताना 'शेतकऱ्यांचा आसूड' या ग्रंथाचा आधार घेऊन या पुस्तकातील काही काव्यपंक्ती प्रस्तुत करून त्यांनी शिक्षणाबद्दलचे महत्त्व पटवून दिले.

विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली।

गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले;

 इतके अनर्थ एका अविद्येने केले l 

   या काव्यपंक्तीच्या माध्यमातून शिक्षण विषयक प्रखर भूमिका व तत्वज्ञानाचा खऱ्या अर्थाने पाया म्हणून त्यांनी शैक्षणिक क्रांतीला प्रारंभ केला.

       महात्मा फुले हे शिक्षण, समता आणि मानवतेचे दीपस्तंभ होते. त्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवून समाजाला नवी दिशा दिली. म्हणूनच ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण मानवजातीचे क्रांतीसूर्य ठरतात.ज्योतिराव फुले यांच्या कार्याची दखल घेत व जनमानसात असणारी खऱ्याखुऱ्या समाजसुधारकाची प्रतिमा व आस्था यामुळे त्यांच्या विचार व कृतीने प्रभावित होऊन ११ मे १८८८ मध्ये मुंबई येथील सार्वजनिक जाहीर सभेत महात्मा ही पदवी बहाल करून त्यांचा गौरव करण्यात आला. वर्तमानात व भविष्यात या ज्योतिराव फुले नामक व्यक्तिमत्वाला व महात्माला कोणीही विसरू शकत नाही हे मात्र सत्य आहे. आज देशातील प्रत्येक चळवळीचा प्रणेता म्हणून महात्मा फुलेंना वंदन केले जाते. हे विश्व समाजसुधारक व क्रांतीसूर्य महात्मा फुले हे २८ नोव्हेंबर १८९० मध्ये कालवश झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा