Breaking

शनिवार, १८ एप्रिल, २०२६

*लष्करात करिअर म्हणजे राष्ट्र सेवेचा सर्वोत्तम मार्ग : कर्नल विक्रम नलवडे*

 

 कर्नल रविकांत नलवडे, संस्थेचे सचिव डॉ.महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व मान्यवर 

*प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


जयसिंगपूर : लष्करी करिअर बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन, शिस्त आणि सातत्यपूर्ण अभ्यास यावर भर देऊन राष्ट्रसेवा करण्याची उत्तम संधी प्राप्त होणार असल्याचे मत कर्नल विक्रम नलवडे यांनी व्यक्त केले. ते येथील अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने आयोजित “भारतीय लष्करातील विविध विभागांतील करिअर” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलत होते.

     ते पुढे म्हणाले, भारतीय लष्करामध्ये सर्व शाखांतील विद्यार्थी विविध प्रवेश परीक्षा व प्रशिक्षण प्रक्रियेद्वारे अधिकारी तसेच इतर पदांवर भरती होऊ शकतात. एनडीए, सीडीएस, टेक्निकल एंट्री, अग्निवीर यांसारख्या विविध मार्गांद्वारे देशसेवेची संधी प्राप्त होते. यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय शालेय जीवनातच निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आजचे युग हे तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल व इंटरनेटचा वापर मनोरंजनासाठी न करता ज्ञानवृद्धी, कौशल्यविकास आणि करिअर नियोजनासाठी करणे गरजेचे आहे.

    प्रारंभी संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. या कार्यक्रमाच्या नीलिमा चाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कॉलेज चे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, अनेकांत स्कूलचे व्यवस्थापक अभिजीत अडदंडे, शैक्षणिक समन्वयक कल्याणी अक्कोळे, शिस्तपालन समिती प्रमुख शिल्पा अडदंडे, प्रा. एम. ए. शिंगे, प्रा. सुशांत पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.आभार प्रा. महेश शिंगे यांनी मानले.

    या कार्यक्रमाला एकलव्य स्पर्धा परीक्षा अकॅडमी,अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल, जयसिंगपूर कॉलेज आणि परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा