Breaking

शनिवार, २ मे, २०२६

*प्रा. अमोल जयराम पवार यांनी इतिहास विषयातून संपादन केली पीएच.डी. पदवी*


डॉ. अमोल जयराम पवार, सिदनाळ( निपाणी) जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर 

*प्रा. डॉ. महावीर बुरसे  : उपसंपादक*


जयसिंगपूर : शैक्षणिक व संशोधन क्षेत्रासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी करत जयसिंगपूरच्या  डॉ. अमोल जयराम पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथून इतिहास विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय “कोल्हापूर संस्थानातील छत्रपती राजाराम महाराजांचे शेतीविषयक कार्य (इ.स. 1897 ते इ.स. 1940)” असा होता. कोल्हापूर संस्थानातील कृषी सुधारणा, शेतकरी धोरणे आणि सामाजिक बदल यांचा सखोल अभ्यास या प्रबंधात करण्यात आला आहे.

        या संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. चंद्रकांत संदिपान चव्हाण (वालचंद महाविद्यालय सोलापूर) यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पवार यांनी ऐतिहासिक कागदपत्रे, संदर्भग्रंथ आणि संस्थानकालीन धोरणांचा अभ्यास करून संशोधन पूर्ण केले.सध्या डॉ. पवार हे जयसिंगपूर कॉलेज येथे कनिष्ठ विभागात इतिहास विषयाचे सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.


*शैक्षणिक प्रवास*

    डॉ. पवार यांचे मूळ गाव सिदनाळ (ता. निप्पाणी, जि. बेळगाव) असून प्राथमिक शिक्षण : सिदनाळ मराठी मुलांची शाळा, माध्यमिक शिक्षण : सन्मती विद्या मंदिर सिदनाळ,उच्च शिक्षण : देवचंद कॉलेज अर्जुननगर व  बी.एड. : दिनकरराव क. शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गडहिंग्लज येथे पूर्ण केले आहे.

 *सामाजिक व इतिहास संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य*

     डॉ. अमोल पवार हे केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता विविध सामाजिक संघटना, उपक्रम आणि चळवळींच्या माध्यमातून समाजसेवेसाठी सतत कार्यरत असणारे व्यक्तिमत्त्व आहे. समाजातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जाणीवा दृढ व्हाव्यात, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण व्हावी, समाजाशी नाळ जुळलेली राहावी आणि शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष जीवनाशी जोडले जावे, हा त्यांचा कायमचा प्रयत्न असतो.शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याबाबत ते विशेष आग्रही आहेत. आधुनिक अध्यापन पद्धती, उपक्रमाधारित शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अभ्यासवृत्ती वाढवणारे कार्यक्रम, शैक्षणिक सहली, व्याख्याने, कार्यशाळा अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. शिवजयंती व छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने किल्ले बांधणी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा  व इतिहासकालीन प्रबोधनात्मक रॅलीच्या माध्यमातून विचारांचा व कृतीचा जागर करण्याचा प्रयत्न करीत असतात. 

           विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही ते तितकेच महत्त्व देतात. विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते, मार्गदर्शकाची भूमिका आणि सदैव प्रोत्साहन देणारी वृत्ती यामुळे ते “विद्यार्थीप्रिय शिक्षक” म्हणून सर्वपरिचित झाले आहेत.

     इतिहास विषयाबद्दल असलेली त्यांची विशेष आवड आणि अभ्यासू वृत्ती लक्षात घेता ते अनेक इतिहास संशोधन संघटनांचे सक्रिय सभासद आहेत. ऐतिहासिक साधनसामग्रीचे संकलन, संशोधन, व्याख्याने, चर्चासत्रे आणि संशोधनपर लेखन यामधून ते सातत्याने योगदान देत आहेत. महाराष्ट्राचा तसेच देशाचा गौरवशाली इतिहास जनतेपर्यंत पोहोचवणे, नव्या पिढीत इतिहासाविषयी अभिमान व जाणीव निर्माण करणे आणि इतिहास संशोधनाला चालना देणे, हे त्यांचे ध्येय आहे.एकूणच, शिक्षण, समाजकार्य आणि इतिहास संशोधन या तिन्ही क्षेत्रांत सक्रिय राहून समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. पवार यांची ओळख निर्माण झाली आहे.

       डॉ. पवार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, उपप्राचार्य भारत आलदर तसेच पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे,प्रा. डॉ. संदीप साबळे, प्रा. डॉ. प्रभाकर माने,कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे यांचे विशेष सहकार्य लाभले. सीनियर व ज्युनियर विभागातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

       डॉ. अमोल पवार यांच्या या यशामध्ये वडील जयराम पवार,आई सौ.छाया पवार व पत्नी सौ.मधुरा पवार यांचा महत्त्वाचा वाटा आहे.त्यांचा यशामुळे निपाणी व जयसिंगपूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा