Breaking

मंगळवार, ५ मे, २०२६

*जयसिंगपूरची आक्सा यासीन बागवानची ओबीसी प्रवर्गातून एनएनएमएस परीक्षेत राज्यात प्रथमस्थानी गरुडझेप*

  

कु. आक्सा यासीन बागवान (जयसिंगपूर) 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन करता येते याचा प्रेरणादायी आदर्श जयसिंगपूरमधील विद्यार्थिनी कु. आक्सा यासीन बागवान हिने घालून दिला आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेतल्या जाणाऱ्या एनएनएमएस (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावत तिने अभिमानास्पद यश मिळवले आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धात्मक परीक्षेत आक्साने 180 पैकी तब्बल 156 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले.

     आक्सा सध्या नवजीवन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. अत्यंत साध्या व कष्टकरी कुटुंबातील ही विद्यार्थिनी असून तिचे वडील यासीन बागवान चायनीज गाडा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई घरकाम करून कुटुंबाला हातभार लावते. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची ओढ आणि पालकांचा पाठिंबा यामुळे आक्साने हे यश मिळवले आहे.

     अभ्यासाबरोबरच आक्साला साहित्याचीही विशेष आवड आहे. कविता वाचन आणि लेखन हा तिचा छंद असून आपल्या आई-वडिलांविषयी असलेले प्रेम, आदर आणि कृतज्ञता ती स्वरचित कवितांमधून व्यक्त करते. तिच्या संवेदनशील आणि सर्जनशील स्वभावामुळे शाळेत ती सर्वांची लाडकी विद्यार्थिनी बनली आहे.या यशासाठी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब भांदिगिरे, राजन वाले, अभिजीत भांदिगिरे तसेच मुख्याध्यापक संभाजी बोरचाटे यांचे तिला विशेष सहकार्य लाभले. याशिवाय शिक्षक सुनील खाडे, विठ्ठल चव्हाण, धनाजी देशमुख आणि प्राजक्ता पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे तिची शैक्षणिक वाट अधिक भक्कम झाली.

           आक्साच्या या यशामुळे जयसिंगपूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळा, पालक आणि नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा