![]() |
| अर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील अर्थशास्त्र अधिविभागाचा (स्वायत्त) 'माजी विद्यार्थी मेळावा - २०२६' (१३ मे, २०२६) अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. अनेक वर्षांनंतर जुने मित्र आणि मार्गदर्शक एकत्र आल्याने अधिविभागाचा परिसर आठवणींनी उजाळून निघाला होता.
अधिविभागाचे प्रा. डॉ. एस. टी. कोंबडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. "जुन्या आठवणींना उजाळा देणे आणि माजी विद्यार्थ्यांचे एक भक्कम नेटवर्क तयार करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे," असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यापीठातील आपले जुने अनुभव, 'आपुलकीच्या भेटीगाटी' आणि आपल्या यशाच्या प्रवासातील अधिविभागाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.
अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एम. एस. देशमुख होते. त्यांनी आपल्या भाषणात माजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व अन्य कार्यक्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले. हे माजी विद्यार्थी समाज व राष्ट्र विकासाच्या कार्यामध्ये सातत्याने कार्यरत असल्याने राष्ट्र विकासाच्या परिवर्तनाची नांदी या माध्यमातून होत असल्याचे मत व्यक्त केले. विशेष करून अधिविभागाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी. आर. पाटील यांनी केले. डॉ. डी. आर. ननवरे यांनी उपस्थित सर्व घटकांचे आभार व्यक्त केले.या मेळाव्यासाठी अधिविभागातील सर्व प्राध्यापकवृंद व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते."नाती जुनी, आठवणी अनमोल" या ब्रीदवाक्यानुसार पुन्हा एकदा भेटण्याच्या जिद्दीने सर्व विद्यार्थी आपापल्या कार्यक्षेत्राकडे रवाना झाले.
माजी विद्यार्थी मेळावा चे उत्तम व सूत्रबद्ध आयोजन अर्थशास्त्र अधिविभागाच्या माध्यमातून करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा