Breaking

शनिवार, ३० मे, २०२६

*विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारी ज्ञानयोगिनी आदर्श शिक्षिका : प्रा.सौ. प्राजक्ता पाटील*


प्रा. प्राजक्ता प्रदीप पाटील
 नवजीवन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर 


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक* 


       सकल स्त्रीशक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या रणरागिनी जिजामाता, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि स्त्रीउद्धारासाठी आयुष्य वेचणाऱ्या सर्व महान महिलांच्या विचारांचा वारसा जपत, आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या ज्ञान, कर्तृत्व, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटविणाऱ्या आदरणीय प्रा. सौ. प्राजक्ता पाटील मॅडम यांची नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मे २०२६ रोजी ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.संस्थेचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष मा. बाळासाहेब भांदिगरे आणि सचिव मा. राजन वाले साहेब यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली त्यांनी आपल्या अध्यापन कार्याची यशस्वी वाटचाल केली. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविणे, सामाजिक जाणीवा जागृत करणे आणि शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवून आणणे हा त्यांचा ध्यास होता. त्यामुळे त्यांचे अध्यापन कार्य हे केवळ ज्ञानदानापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपणारे ठरले.

         शिक्षण हे केवळ ज्ञानदानाचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीची एक प्रभावी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशाच विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या, ज्ञानासोबत संस्कारांचे बीजारोपण करणाऱ्या आदर्श शिक्षिका म्हणजे प्रा. सौ. प्राजक्ता पाटील मॅडम होय.

       प्रा. पाटील मॅडम या अभ्यासू, मेहनती, कर्तव्यदक्ष, विद्यार्थ्यांवर अपार प्रेम करणाऱ्या तसेच शिस्तप्रिय आणि स्पष्टवक्त्या शिक्षिका आहेत. त्यांनी आपल्या अध्यापनातून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच दिले नाही, तर उत्तम संस्कार, सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्ये आणि शिस्तीचे महत्त्वही प्रभावीपणे शिकवले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची तळमळ सदैव दिसून येते.भूगोल हा विषय अनेकांना क्लिष्ट वाटतो; परंतु प्रा. पाटील मॅडम यांनी आपल्या अध्यापन कौशल्याच्या बळावर हा विषय अत्यंत सोप्या, रंजक आणि समजण्यास सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांच्या अध्यापनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष कृती, उपक्रम आणि अनुभवाधारित शिक्षण. त्यामुळे विद्यार्थ्यांना भूगोल विषय केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता जीवनाशी जोडलेला वाटू लागला.माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सन 1995 मध्ये बारावीत असताना शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी शिक्षक म्हणून भूगोल विषयाचे अध्यापन करण्याची मिळालेली संधी. या अनुभवामुळे माझ्या मनात प्राध्यापक होण्याची प्रेरणा निर्माण झाली. आज मी उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे, यामागे प्रा. प्राजक्ता पाटील यांच्यासह तत्कालीन काळातील मुख्याध्यापक डी. आर. खामकर, प्रा. सौ. कुलकर्णी, प्रा. सौ. शिंगे मॅडम आणि प्रा. बाळ संकपाळ यांचे अमूल्य मार्गदर्शन होते. प्रा. प्राजक्ता पाटील मॅडम यांच्या उच्च शिक्षणाच्या प्रवाहात  उपप्राचार्य प्रा.के.बी.पाटील  व प्रा. डॉ. ए. ए. पुजारी व अन्य गुरुवर्यांची साथ मिळाली. यामुळे पाटील मॅडम यांनी उच्च शिक्षणातील आपलं स्थान बळकट केले.

      प्रा. पाटील मॅडम यांचा स्वभाव विद्यार्थ्यांच्या हितासाठी कडक असला तरी तो तितकाच सहकार्यशील आणि संवेदनशील आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांच्या क्षमतांना वाव देणे आणि त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यास प्रेरित करणे हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांशीही सुसंवाद साधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअरविषयक प्रगतीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

     भूगोल विषयातील विविध संधी विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि करिअरच्या नव्या दिशा दाखवल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी प्राध्यापक, शिक्षक तसेच विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांचे धडे त्या आपल्या कृतीतून विद्यार्थ्यांना देतात. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांनी अध्यापन, प्रबोधन आणि मार्गदर्शनाचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या मनातील आदर्श शिक्षिका बनल्या आहेत.

      प्रा. पाटील मॅडम यांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे. त्यांनी दाखविलेला सत्याचा, शिक्षणाचा आणि जीवनमूल्यांचा मार्ग आजही अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. शैक्षणिक क्षेत्रातील निस्सीम श्रद्धा, समर्पण आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व यांमुळे प्रा. सौ. प्राजक्ता पाटील मॅडम यांचा आम्हा सर्व विद्यार्थ्यांना सार्थ अभिमान आहे.त्यांचे कार्य, मार्गदर्शन आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व हे भावी पिढ्यांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत राहील, याबद्दल कोणतीही शंका नाही.

   या प्रवासात संस्थेचे संचालक अभिजीत भांदिगरे,  मुख्याध्यापक संभाजी बोरचाटे, सर्व सहकारी प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व कर्मचारी यांचे मिळालेले सहकार्य तसेच पती मा.प्रदिप पाटील व कुटुंबाची लाभलेली खंबीर साथ यामुळे त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य अधिक व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोहोचले.विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्याचे महान कार्य त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्ती, कुशल नेतृत्व, कर्तव्यनिष्ठा आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या बळावर यशस्वीपणे पार पाडले. त्यांचे योगदान संस्थेसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील.

    त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पुढील आनंदी, निरामय आणि समाधानकारक आयुष्यासाठी जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने  मनस्वी शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा