![]() |
| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरा करताना भरत हातगिणे, किरण कोरोशेट्टी, प्रा. डॉ. तुषार घाटगे |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेज मध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन व विचारप्रबोधन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी होळकर यांच्या कृतीशील विचारांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भरत हातगिणे व किरण कोरोशेट्टी यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना भरत हातगिणे म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या दूरदृष्टी, न्याय,समता, लोककल्याणकारी धोरणे आणि समाजसेवेच्या कार्यातून आदर्श राज्यकारभाराचा उत्कृष्ट मॉडेल जगासमोर निर्माण केले. त्यांनी देशभरातील अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि सार्वजनिक बांधकामे उभारून समाजहिताची परंपरा जोपासली. यामध्ये विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरे व धर्मशाळा यांची निर्मिती केली.
यावेळी किरण कोरोशेट्टी म्हणाले, अहिल्यादेवींचे समग्र कार्य हे स्त्रीशक्ती, सामाजिक समता आणि लोककल्याण यासाठी व्यतीत झाले. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करून कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचे मूल्य आत्मसात करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली नॅक समन्वयक प्रा. डॉ. तुषार घाटगे यांनी नियोजन केले. याप्रसंगी एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने,प्रा. रमेश शिंदे, कार्यालयीन अधीक्षक संजय चावरे, सुहास हिरुकडे, हिरालाल पवार, सतीश माणगावे, शिवराज हिरुकुडे, सिद्धू मल्हारी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व एन. एस. एस.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा