![]() |
| शाहूपुरी चे महिला पोलीस उपनिरीक्षक निलंबित |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : पत्नीवरील हल्ला प्रकरणातील संशयिताला गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच जामीन मिळवून देण्याचे आश्वासन देत २५ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक अपर्णा सुखदेव जाधव (रा. हातनोळी, ता. तासगाव) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर त्यांना पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस दलातील एका महिला अधिकाऱ्यावर त्यांच्या पतीने नागाळा पार्क येथील फ्लॅटमध्ये मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांच्याकडे होता.
तपासादरम्यान संशयिताला अटक करण्यात आली होती. त्यानंतर संशयिताला गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच कोठडीची मुदत संपल्यानंतर जामीन मिळवून देण्यासाठी उपनिरीक्षक जाधव यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यापूर्वीही त्यांनी तक्रारदाराच्या वडिलांकडून २५ हजार रुपये घेतल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी (ता. २२) शाहूपुरी पोलिस ठाण्यात सापळा रचण्यात आला. मात्र, कारवाईची माहिती मिळाल्याची कुणकुण लागल्याने जाधव यांनी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नाही. तरीही पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गुरुवारी रात्री उशिरा उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा