Breaking

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६

*जयसिंगपूरच्या शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणीय विकासाचे शिलेदार : डॉ. सुभाष बाबुराव अडदंडे*

 जयसिंगपूर भूषण, प्रसिद्ध धन्वंतरी, कॉलेजचे चेअरमन  डॉ. सुभाष अडदंडे 


*लेखक प्रा. डॉ. प्रभाकर तानाजी माने* 

 प्रमुख,अर्थशास्त्र विभाग व संपादक जय हिंद न्यूज नेटवर्क*

 जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर 


          जयसिंगपूर भूषण, प्रसिद्ध धन्वंतरी, शिक्षणप्रेमी, पर्यावरणस्नेही आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. सुभाष बाबुराव अडदंडे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून जयसिंगपूर शहर व परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्यविकास, पर्यावरण संवर्धन, क्रीडा, सामाजिक बांधिलकी आणि सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन सातत्याने कार्यरत असणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

       सन २००४ पासून जयसिंगपूर कॉलेजच्या भौतिक व शैक्षणिक विकासासाठी डॉ. अडदंडे यांनी सातत्याने प्रयत्न केले. सुरुवातीला संस्थेचे सचिव म्हणून व त्यानंतर संस्थेचे कार्यक्षम अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. ग्रामीण व खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी, या दूरदृष्टीतून विविध पदव्युत्तर विभाग सुरू करण्यात आले. बदलत्या काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व कौशल्याधारित शिक्षण मिळावे म्हणून बी.व्होक. प्रिंटिंग प्रेस, ऑटोमोबाईल, बी.एस्सी. फूड सायन्स यांसारखे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पदवी न मिळता प्रत्यक्ष कौशल्य, रोजगाराच्या संधी आणि उत्तम करिअरची दिशा मिळाली. अनेक विद्यार्थ्यांना देश-विदेशात प्लेसमेंटच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. फूड सायन्सच्या माध्यमातून बेकरी स्टॉल, विविध खाद्यपदार्थ निर्मिती आणि पाककलेचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेची वाट दाखविण्यात आली. पाणी व माती परीक्षणासाठी प्रयोगशाळा सुरू करून शेतकरी व नागरिकांना वाजवी दरात सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

       डॉ.अडदंडे सरांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्यज्ञान, नवोपक्रम आणि अर्थार्जनाच्या संधी निर्माण करणारे विविध अभ्यासक्रम व उपक्रम सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या पायावर उभे राहावे, हा त्यामागील मूलभूत विचार आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे विद्यार्थी व पालकांकडून विशेष कौतुक झाले.

       डॉ. अडदंडे हे मुळातच पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमी असल्याने जयसिंगपूर कॉलेजच्या सुमारे २५ एकर परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड व संवर्धन करण्यात आले. त्यातून कॉलेज परिसरात ग्रीन कॉरिडॉर आणि समृद्ध जैवविविधता निर्माण झाली. आज हा परिसर स्वच्छ हवा, प्रसन्न वातावरण आणि निर्मळ श्वास घेण्यासाठी विद्यार्थी, क्रीडाप्रेमी तसेच नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.‘माझी वसुंधरा’ या संकल्पनेचा प्रभावी अवलंब करत प्लास्टिकमुक्त व स्वच्छ परिसरासाठी सातत्याने उपक्रम राबविले जातात. एन.एस.एस. व एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून नियमित स्वच्छता मोहिमा राबवून पर्यावरण संवर्धनाची संस्कृती रुजविली जात असून याद्वारे पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला आहे.

       पर्यावरण संवर्धनाला अभिनवतेची जोड देत कॉलेज परिसरात बटरफ्लाय गार्डन साकारण्यात आले. विविध प्रजातींच्या फुलपाखरांना पोषक अधिवास उपलब्ध करून देणारे हे उद्यान पर्यावरणप्रेमींसाठी आकर्षण ठरले आहे. त्याचबरोबर नक्षत्र गार्डनमध्ये देशी व आयुर्वेदिक वृक्षांचे संवर्धन करण्यात आले असून येथील रोपे व बियाणे नाममात्र दरात शेतकरी व नागरिकांना उपलब्ध करून दिले जातात.

         विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केवळ वर्गखोल्यांपुरता मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रातही त्यांचे भविष्य उज्वल व्हावे, यासाठी कॉलेजमध्ये ४०० मीटरचा धावण्याचा ट्रॅक, इनडोअर स्टेडियम, बॅडमिंटनची सुविधा आणि छ.शाहू महाराज जलतरण तलाव उपलब्ध करून देण्यात आला. विविध तालुका व इतर स्तरांवरील स्पर्धांचे आयोजन या परिसरात होत असते. विद्यार्थ्यांना आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

        विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान समजून घ्यावे आणि प्रगतिशील शेतकरी घडावेत, या उद्देशाने कॉलेज परिसरातील अर्धा एकर क्षेत्रात शेवगा, वांगी, भेंडी, बीट आदी पिकांची लागवड करण्यात आली. शिक्षण आणि प्रत्यक्ष कृती यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित शिक्षणाचे उत्तम उदाहरण ठरला आहे. तसेच त्यांनी कर्मवीरांच्या कमवा व शिका या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना संधी दिली.

         विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण व्हावी यासाठी शाखानिहाय ड्रेस कोडची अंमलबजावणी करण्यात आली. परिणामी कॉलेज कॅम्पसमध्ये शिस्तबद्ध, प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी सैन्य व पोलीस दलात करिअर करावे, यासाठी स्वतंत्र अकॅडमीची निर्मिती करून त्यांना स्पर्धात्मक क्षेत्रासाठी तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

       पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने डॉ. अडदंडे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजची स्थापना करण्यात आली. प्रशस्त व देखण्या शैक्षणिक संकुलातून हजारो विद्यार्थी विज्ञानवादी, कौशल्याधारित आणि नाविन्यपूर्ण शिक्षण घेत आहेत. विविध अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी करणाऱ्या या शाळेला सीबीएसई बोर्डाची मान्यता मिळणे ही संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाची उपलब्धी आहे.

     जयसिंगपूरच्या सांस्कृतिक व कलाक्षेत्राला नवे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने डॉ. एस. एस. भिर्डी रंगमंदिराची सुंदर व देखणी वास्तू उभी करण्यात आली. स्थानिक नाट्यकलावंत आणि रसिक प्रेक्षकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे त्यांचे स्वप्न या प्रकल्पातून साकार झाले.

      बचत आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधण्यासाठी मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. पर्यावरणपूरक विचार, ऊर्जा बचत आणि शाश्वत विकास यांचा कृतीतून आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम उल्लेखनीय आहे.

      डॉ. अडदंडे यांच्या या प्रदीर्घ कार्यप्रवासात पी.बी.पाटील,   स्वातंत्र्य सेनानी ल. क. अकिवाटे, डॉ.एस.के.पाटील, प्राचार्य डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे, त्यांचे वडील बाबुराव अडदंडे हे गुरुरुपी आदर्श व्यक्तिमत्व लाभले.तसेच संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, पद्माकर पाटील, प्रा. आप्पासाहेब भगाटे, डॉ. धवलकुमार पाटील, अशोक शिरगुप्पे, बाळासाहेब इंगळे, संस्थेतील सर्व सदस्य तसेच प्राचार्य डॉ. सुरत मांजरे आणि अधीक्षक संजय चावरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्या या जीवन प्रवासात त्यांची अर्धांगिनी सविता अडदंडे,कन्या हेमांगी शीतल पाटील, चिरंजीव अभिजीत अडदंडे व शिल्पा अभिजीत अडदंडे  कुटुंबीयांचे महत्त्वाचे योगदान लाभले.

        अत्यंत कडक शिस्तीचे, मात्र त्याच वेळी विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल संवेदनशील असणारे, कुशल प्रशासक, नाट्य रंगप्रेमी, शिस्तबद्ध व्यक्तिमत्व व उत्तम नेतृत्व म्हणून डॉ. अडदंडे यांचा उल्लेख केला जातो. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, कौशल्यविकास, क्रीडा आणि सांस्कृतिक विकास या सर्व क्षेत्रांना समान महत्त्व देत त्यांनी अनेकांत शिक्षण संकुलाच्या विकासाला व्यापक स्वरूप दिले.

       डॉ. अडदंडे यांचे कार्य म्हणजे केवळ एका शिक्षणसंस्थेचा विकास नव्हे; तर शिक्षणाला संस्कारांची, कौशल्याला रोजगाराची, पर्यावरणाला संवर्धनाची आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना वास्तवाची जोड देणारी एक अखंड विकासमार्ग आहे.

        आज त्यांच्या जीवनाची ७८ वर्षे पूर्ण होत असताना, त्यांच्या कार्याचा हा प्रेरणादायी प्रवास पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच समाजोपयोगी, शैक्षणिक व पर्यावरणपूरक कार्ये अखंडपणे घडत राहोत, हीच मनःपूर्वक सदिच्छा.

      जय हिंद न्यूज नेटवर्क परिवार व अनेकांत परिवारातील सर्व घटकांकडून डॉ. सुभाष बाबुराव अडदंडे सरांना ७८व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक,मंगलमय आणि मनस्वी शुभेच्छा! 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा