| राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रभाकर माने, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एस. शेजाळ, उपप्राचार्य प्रा.डॉ. शहा व कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप रावळ |
सामाजिक बांधिलकीतून युवकांनी राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे.
*प्रा. गणेश कुरले : विशेष प्रतिनिधी*
सांगली : राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली केवळ संघटना नसून राष्ट्रप्रेम, राष्ट्रविकास आणि सामाजिक परिवर्तनाची प्रभावी चळवळ आहे, असे प्रतिपादन जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरचे प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी केले.ते राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त गणपतराव आरवाडे ऑफ कॉमर्स कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एस. शेजाळ होते.
प्रा. डॉ. माने म्हणाले, सामाजिक बांधिलकी ही समाजाच्या विकासाबरोबरच राष्ट्रविकासासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देत त्यांच्यामध्ये संवेदनशीलता, जबाबदारी आणि नेतृत्वगुण विकसित करता येतात. युवकांनी स्वयंप्रेरणेने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याबाबत आवाहन केले.
ते पुढे म्हणाले, नदी स्वच्छता, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मतदार जनजागृती, प्रबोधन रॅली, आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण, गरजूंची मदत आणि रक्तदान यांसारख्या रचनात्मक उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपावी. अशा उपक्रमांमुळे समाजातील विविध घटकांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास मदत होते. युवकांचा सामाजिक सहभाग वाढल्यास भारताच्या बलशाहीपणाला चालना व बळकटी मिळेल.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. एस. शेजाळ म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक विद्यार्थी संघटना न राहता सामाजिक आणि राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. युवकांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ करावी.
प्रा. डॉ. शहा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप रावळ यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन एन.एस.एस. विभागाने केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा