Breaking

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

विवेकी व शास्त्रीय विचारांतून सुदृढ समाजनिर्मिती शक्य : डॉ. चिदानंद आवळेकर

 

 विवेक वाहिनी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. चिदानंद आवळेकर, अध्यक्षस्थानी  डॉ. महावीर बुरसे, प्रा. डॉ. व्ही. व्ही. चौगुले व डॉ. प्रतिभा जावळे  


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी विवेकवाहिनीच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध आणि विवेकी विचार करण्याची दिशा समाजाला दिली. विद्यार्थ्यांनी बुद्धीचा सारासार विचार करून योग्य निर्णय घेण्याची सवय लावली पाहिजे. त्यातूनच सुदृढ व निरोगी समाजाची निर्मिती होईल असे प्रतिपादन प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. चिदानंद आवळेकर यांनी जयसिंगपूर कॉलेजमध्ये महाराष्ट्र विवेकवाहिनीच्या शाखेचे उद्घाटन प्रसंगी केले.अध्यक्षस्थानी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. महावीर बुरसे होते. यावेळी मानव्य विद्याशाखा प्रमुख प्रा. डॉ. व्ही. व्ही. चौगुले उपस्थित होते.

      यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. चिदानंद आवळेकर म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने कृतिशील व विवेकी विचारांच्या माध्यमातून आपले जीवन अधिक सुकर केले पाहिजे. व्यक्ती श्रद्धावान असावी; मात्र ती अंधश्रद्धाळू, अविवेकी, पाखंडी किंवा कर्मकांडाच्या आहारी गेलेली नसावी. विवेकवाहिनीच्या चळवळीच्या माध्यमातून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकी विचार रुजविणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

    प्रा. डॉ. व्ही. व्ही. चौगुले म्हणाल्या, “विवेकवाहिनी ही आरोग्यपूर्ण आणि विवेकी समाजनिर्मितीचे मूलभूत केंद्र आहे. नीतीमूल्ये, शास्त्रीय दृष्टिकोन आणि वास्तववादी विचार स्वीकारणारा समाज घडविण्यासाठी अशा चळवळींची गरज आहे.”

       अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य डॉ. महावीर बुरसे म्हणाले, भारताचा जागतिक आनंद निर्देशांकातील क्रमांक चिंताजनक आहे. आपल्या देशात विविध धर्म व जातींच्या माध्यमातून धार्मिक भावना व्यक्त केल्या जातात; मात्र केवळ कर्मकांडावर भर देण्यापेक्षा विवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. विवेकी समाजनिर्मिती ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

      महाराष्ट्र विवेकवाहिनीच्या प्रमुख प्रा. डॉ. प्रतिभा जावळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. सुरज चौगुले यांनी केले, तर प्रा. आरती क्षीरसागर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सुरज मांजरे यांचे प्रेरणा, मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

       यावेळी प्रा. बाळगोंडा पाटील, प्रा. राजाराम कांबळे, प्रा. गणेश कुरले, प्रा. बागवान, प्रा. लक्ष्मी, प्रा. विशाल बडबडे यांच्यासह अन्य प्राध्यापकवृंद तसेच विवेकवाहिनीचे सभासद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा