*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकान्त एज्युकेशन सोसायटी, गव्हर्निंग कौन्सिल, बारामतीचे अध्यक्ष जवाहरभाई मोतीलाल शहा (वाघोलीकर) यांचे वयाच्या ८२व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेकान्त शैक्षणिक परिवाराचा आधारवड हरपला असून, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक अनुभवी, दूरदृष्टीचे, कणखर व निस्वार्थी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण अनेकान्त परिवारात शोककळा पसरली आहे.
जवाहरभाई शहा यांनी अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य समर्पित केले. जयसिंगपूर येथील संस्थेची स्थानिक समिती, जयसिंगपूर कॉलेज तसेच अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या शैक्षणिक वाटचालीत त्यांचे मार्गदर्शन आणि योगदान मोलाचे राहिले. कोणत्याही वैयक्तिक लाभाची अपेक्षा न ठेवता संस्थेची भरभराट, शैक्षणिक गुणवत्तेची वृद्धी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये जवाहरभाई शहा यांच्या नेतृत्वाचा ठसा उमटला. सचिवपदाच्या कारकिर्दीत त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च स्थान मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले. धडाडीचे नेतृत्व, कणखर निर्णयक्षमता, दूरदृष्टी आणि सर्वोत्तम कामगिरी साध्य करण्याची जिद्द यांच्या बळावर त्यांनी संस्थेच्या विकासाला नवी दिशा दिली.
त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेकडून (NAAC), बेंगळुरू यांच्याकडून ‘A+’ मानांकन प्राप्त झाले. तसेच भारत सरकारच्या २०२० मधील राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (NIRF) स्वायत्त महाविद्यालयांच्या गटात देशातील पहिल्या १०० महाविद्यालयांमध्ये ५८वे, तर महाराष्ट्रातील यादीत १६वे स्थान मिळाले. महाविद्यालयाच्या या यशस्वी वाटचालीत त्यांनी केलेले मार्गदर्शन, घेतलेले निर्णय आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले.
संस्थेचा विकास साधताना जवाहरभाई शहा यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका कायम जपली. सहकाऱ्यांशी आपुलकीचे संबंध, सर्व घटकांमध्ये समन्वय आणि संस्थेच्या हितासाठी आवश्यक तेव्हा कठोर निर्णय घेण्याची तयारी, ही त्यांच्या नेतृत्वाची ठळक वैशिष्ट्ये होती. संस्थेच्या कारभारात शिस्त आणि कार्यक्षमतेला महत्त्व देतानाच त्यांनी माणसे जोडण्याची हातोटीही जपली. मात्र संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी काही निर्णय कठोर घेतले.
आजच्या काळात स्वतःची प्रगती साधणारे अनेक जण दिसतात; मात्र स्वतःच्या प्रगतीसोबत इतरांच्या उन्नतीचाही ध्यास घेणारी व्यक्तिमत्त्वे विरळाच असतात. जवाहरभाई शहा हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून अनेकांना प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली. स्वतः परिश्रम करून इतरांच्या आयुष्यात प्रगतीची वाट निर्माण करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीतून सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श दिसून येतो.
त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी असून जवाहरभाई शहा यांच्या निधनाने अनेकान्त एज्युकेशन सोसायटीने केवळ अध्यक्षच नव्हे, तर संस्थेच्या प्रगतीचा ध्यास घेतलेला एक उत्तम नेतृत्व व मार्गदर्शक गमावला आहे. त्यांनी संस्थेच्या विकासासाठी घेतलेले परिश्रम, शैक्षणिक व शैक्षणिक गुणवत्तेबाबत जपलेली बांधिलकी आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची वृत्ती यांचा वारसा आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल जयसिंगपूर कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील, डॉ. धवल पाटील, प्रा. आप्पासाहेब भगाटे, अभिजीत अडदंडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, अधीक्षक संजय चावरे व अनेकान स्कूलचे मुख्याध्यापक बाळकृष्ण पाटील,प्राध्यापकवृंद, प्रशासकीय सेवक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी दुःख व्यक्त केले. सर्वांनी कालवश जवाहरभाई शहा यांना श्रद्धांजली अर्पण करत शहा कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग व्यक्त केला.
श्रीमान शेठ जवाहरभाई शहा यांचे कार्य, नेतृत्व आणि संस्थेच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान अनेकान्त परिवाराच्या स्मरणात सदैव राहील. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्याच्या कार्याला सलाम!

भावपूर्ण श्रद्धांजली
उत्तर द्याहटवा