Breaking

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२६

*सुटाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. आर. के. चव्हाण विजयी; कार्यकारिणीच्या सर्व १५ जागांवर सत्तारूढ गटाचे उमेदवार विजयी*


विजयी उमेदवार अध्यक्ष डॉ. रवींद्र चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील व खजिनदार डॉ. गजानन चव्हाण 


प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर  : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) मध्यवर्ती द्वैवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र कृष्णा तथा आर. के. चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ गटाने संघर्ष समितीला धक्का देत दणदणीत विजय मिळविला. कार्यकारिणीच्या सर्व १५ जागांवर सत्तारूढ गटाच्या उमेदवारांनी विजय मिळविल्याने संघटनेवरील आपले वर्चस्व कायम राखण्यात या गटाला यश आले.

      गेल्या दोन वर्षांपासून सत्तारूढ गट आणि संघर्ष समिती यांच्यात आरोप-प्रत्यारोप आणि पत्रकबाजीमुळे वातावरण तापले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापकांचे लक्ष लागले होते. सत्तारूढ गटाला आव्हान देण्यासाठी प्रा. निवास वरेकर यांच्यासह काही निवृत्त पदाधिकाऱ्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून निवडणुकीत ताकद लावली होती.

    अंबाई डिफेन्स येथील ‘सुटा’च्या मध्यवर्ती कार्यालयात रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान झाले. या निवडणुकीत तब्बल ९८ टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी साडेपाच वाजता मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीपासूनच सत्तारूढ गटाने आघाडी कायम ठेवत विजयाकडे वाटचाल केली.

   अध्यक्षपदी प्रा. डॉ. आर. के. चव्हाण (सातारा), कार्यवाहपदी प्रा. अनिल पाटील (सांगली) आणि खजिनदारपदी प्रा.डॉ. गजानन चव्हाण (कोल्हापूर) यांनी विजय मिळविला. लेखापरीक्षकपदी प्रा. किरण भोसले, तर महिला सेलच्या समन्वयकपदी प्रा. सुनीता अमृतसागर यांची बिनविरोध निवड झाली.

    कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. अमृतसागर, डॉ.अरुण शिंदे, डॉ.प्रल्हाद दराडे, डॉ.तुषार घाटगे, डॉ.मारुती हजारे,डॉ. रूपाली संकपाळ, डॉ.योगिता पाटील, डॉ.प्रकाश निंबाळकर, डॉ.ज्ञानदेव काळे, डॉ.विश्वनाथ सुतार, डॉ.शाहीन पटेल, डॉ.संभाजी कदम, डॉ.कृष्णात जाधव, डॉ.अविनाश साळुंखे आणि डॉ.संदीप रावळ हे सर्व १५ उमेदवार विजयी झाले.

   निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. मनोज गुजर यांनी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली. विजयानंतर नूतन पदाधिकारी प्रा. अनिल पाटील, डॉ. चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सुहन मोहोळकर यांनी आभार मानले.

      सुटाच्या या निवडणुकीत सत्तारूढ गटाने मिळविलेला एकतर्फी विजय हा संघटनेतील नेतृत्वावरील सभासदांच्या विश्वासाचे द्योतक मानला जात असून, आगामी काळात संघटनेच्या कार्याची दिशा काय असेल, याकडे प्राध्यापकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा