![]() |
| मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राजकुमार वाईगडे, डॉ. श्रीकांत बच्चे, डॉ. संजय ओमासे व अन्य मान्यवर |
महावीर महाविद्यालयात रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वूडफोर्ड यांच्या संशोधनावर ई-पोस्टर सादरीकरण
प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
कोल्हापूर : वैयक्तिक उत्पन्न, उपभोग आणि गुंतवणुकीचे निर्णय समजून घेतल्यास प्रभावी आर्थिक धोरणांची आखणी करता येते, असे प्रतिपादन प्रा. राजकुमार वाइगडे यांनी केले. ते महावीर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग आणि सुयेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानमालेत ते बोलत होते. रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वूडफोर्ड यांच्या संशोधनाचा भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंध स्पष्ट करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिकीकरण, तंत्रज्ञानातील बदल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अनिश्चितता आणि आर्थिक संकटांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचे आर्थिक निर्णय, उत्पन्नातील बदल, उपभोगाची प्रवृत्ती आणि गुंतवणुकीचे स्वरूप यांचा अभ्यास धोरणनिर्मितीसाठी महत्त्वाचा ठरतो. हॉल आणि वूडफोर्ड यांच्या संशोधनातून या प्रक्रियांचे विश्लेषण करण्यासाठी महत्त्वपूर्ण सैद्धांतिक दृष्टिकोन मिळतो, असे प्रा.डॉ.वाईगडे यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी ई-पोस्टर सादरीकरण परिसंवाद घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संबंधित अर्थशास्त्रज्ञांचे संशोधन, विचार आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील उपयुक्तता मांडली. अदिती पाटील, रमेश कांबळे, आर्यश्र कांबळे, अंकिता मालेदार आणि प्रगती रजपूत यांनी सहभाग घेतला.
उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल तेजस मेनन, ओम नागदेव, बिरजू सुतार, अन्विता मुंडे आणि आदिती पाटील यांना प्रशस्तिपत्रे व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. संजय ओमासे यांनी केले. सुयेकच्या कोल्हापूर शहर प्रतिनिधी प्रा. डॉ. संपदा टिपकुरले यांनी विद्यार्थ्यांनी सुयेकतर्फे आयोजित परिषदांमध्ये संशोधनपर लेख सादर करून संशोधनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. श्रीकांत बच्चे होते. प्रा. सखाराम हुंबे आणि प्रा. मानसिंग पाटील यांनी सहकार्य केले. प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुजाता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा