एव्हरेस्ट शिखरावर 23 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी संभाजी गुरव यांनी भारताचा राष्ट्रध्वज रोवला.
![]() |
पोलीस अधिकारी संभाजी गुरव |
सांगली : पोलीस उपनिरीक्षक संभाजी गुरव यांनी 8 हजार 848 मीटर उंची असलेले जगातील सर्वोच्च पर्वत शिखर माऊण्ट एव्हरेस्टला गवसणी घातली. संभाजी गुरव हे मूळ सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पडवळवाडी गावचे आहेत. महाराष्ट्र पोलीस खात्यातील एव्हरेस्ट शिखर सर करणारे ते पहिलेच मराठी अधिकारी ठरले आहेत. तर सुहेल शर्मा आणि रफीक शेख यांच्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलातील तिसरे पोलीस अधिकारी आहेत.
हिंमत सोडली नाही
2019 मध्ये सर्वात आधी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता प्रकृतीने त्यांना साथ न दिल्यामुळे त्यांना ती मोहीम अर्ध्यावर सोडून माघारी परतावे लागले. गुरव यांनी जिद्द न सोडता “एव्हरेस्ट शिखर” सर करण्याचा निर्धार केला. त्यांनी नियमित अवघड पर्वत सर करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले. आणखी एकदा त्यांनी प्रयत्न केला, पण तरीही त्यांना यश आले नव्हते.
तिसऱ्या प्रयत्नात एव्हरेस्टला गवसणी
संभाजी गुरव 6 एप्रिल रोजी एव्हरेस्ट मोहिमेसाठी मुंबईहून निघाले. अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी एव्हरेस्टची चढाई सुरुच ठेवली. अखेर त्यांना तिसऱ्या प्रयत्नात माऊण्ट एव्हरेस्ट शिखर सर करण्यात यश आले. एव्हरेस्ट शिखरावर 23 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज रोवला.
महाराष्ट्र पोलीस दलातील तिसरे अधिकारी
याआधी महाराष्ट्र पोलीस दलातील सांगलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा आणि औरंगाबादमधील पोलीस कर्मचारी रफीक शेख यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. पण एव्हरेस्ट सर करणारे संभाजी गुरव पहिले मराठी पोलिस अधिकारी ठरले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा