कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक संसर्ग होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका नाही असे 'एम्स' रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेला झाला नाही म्हणून तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होईल, याबाबत कोणतेही पुरावे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत वयोवृद्धांना आणि दुसऱया लाटेत तरुणांना अधिक संसर्ग झाला होता. या दोन्ही वर्गांचे लसीकरण सुरू आहे. त्याच आधारावर तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते, असा तर्क मांडला गेला आहे. परंतु त्याला कोणताही आधार नसल्याचे पीडीयाट्रीक असोसिएशनचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्राने कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यास सुरुवात केली आहे. बालरोग तज्ञांचा टास्क फोर्सही स्थापन केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा