कोल्हापूर : महिन्याभरात जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या शंभरीकडे सरकत आहे. आजवर एकूण ८३ रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिसचे गांभीर्य वाढले असून, सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग उपचारसेवा देत असले तरी खासगी डॉक्टरांची मदत घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.
म्युकरमायकोसिस आजाराचे दोन ते सहा रुग्ण रोज नव्याने सापडत आहेत. यात गंभीर रुग्णांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील दोन्ही कक्ष हाऊसफुल्ल झाले आहेत. १२ रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.
शहरात ३० नाक, कान, घसा तज्ज्ञ आहेत. सात-आठ मेंदू विकार तज्ज्ञ आहेत. तेवढेच प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ आहेत. एमआरआय करणारे आठ लोक आहेत. मात्र, हे सर्वजण स्वतंत्र खासगी प्रॅक्टिस करत आहेत व म्युकरवर उपचार करण्यासाठी वरील सर्व वैद्यकीय तज्ज्ञांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यांना एकत्र आणण्यासाठी शासकीय डॉक्टरांनी जरूर प्रयत्न केले, मात्र त्यात यश आलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच तज्ज्ञांशी चर्चा करणे गरजेचे आहे.
- जिल्ह्यात एकूण रुग्ण- ८३
- मृत्यू- ६
- उपचार सुविधा असलेले हॉस्पिटल- ६
- उपचार घेणारे रुग्ण- ६८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा